पोलीस लाईन येथील झाडांसाठी चिपको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:54 AM2019-11-18T10:54:11+5:302019-11-18T11:17:14+5:30
कोल्हापुरात इतकी जुनी वृक्षसंपदा फार कमी आहे. वर्षातील चार महिने येथील झाडांवर स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असतो; त्यामुळे या झाडांची जागा सोडून बांधकाम करावे, अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिक मिलिंद यादव यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले होते.
कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील पोलीस लाईन येथील बांधकामामुळे ७० वर्षांपूर्वीची दोन झाडे तोडण्यात येणार आहेत. या विरोधात परिसरातील नागरिक, सामाजिक संघटनांनी रविवारी झाडाजवळच ठिय्या मारला; तर लहान मुलांनीही झाडाला साखळी करून ‘चिपको’ आंदोलन केले. झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्यास जेसीबीच्या आडवे पडू, एकाही झाडाला हात लावू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. परिसरातील मैदानाच्या बाजूने सुरक्षा भिंत घालून बंदिस्त करण्यालाही विरोध केला.
जुना बुधवार पेठेतील पोलीस लाईन येथे पोलिसांची निवासस्थाने आहेत. येथील बांधकामे जुनी असल्याने त्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे पोलीस विभागाकडून नव्याने तीन अपार्टमेंट उभारल्या जात आहेत. यासाठी खुदाईही केली आहे; परंतु या परिसरात ७० वर्षांपूर्वीची अशोकाची दोन झाडे आहेत. कोल्हापुरात इतकी जुनी वृक्षसंपदा फार कमी आहे. वर्षातील चार महिने येथील झाडांवर स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असतो; त्यामुळे या झाडांची जागा सोडून बांधकाम करावे, अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिक मिलिंद यादव यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिले होते. तरीही झाडांच्या परिसरात खुदाई सुरूच ठेवण्यात आली. यामुळे रविवारी झाडे तोडू नयेत, या मागणीसाठी परिसरातील नागरिक, सामाजिक संघटना यांनी झाडाजवळ ठिय्या मारला. ‘आम्ही झाडे तोडू देणार नाही,’ अशा घोषणा देत लहान मुलांनी झाडाभोवती साखळी करून ‘चिपको’ आंदोलन केले. यावेळी विजय टिपुगडे, बी. एल. बरगे, सुमित कदम, अमित चव्हाण, प्रमोद नायकवडे, उदय सुर्वे, मनीषा रानमाळे, मानसी नाईक, मनीषा नाईक उपस्थित होते.
--------------------------------
घरांना नव्हे, झाडे तोडण्यास विरोध : उदय भोसले
बांधकामासाठी अद्यापही महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. लेआउट मंजूर झाला नसताना खुदाई सुरू केली आहे. पोलिसांच्या घरांना नव्हे तर झाडे तोडण्यास आमचा विरोध आहे. घरे तीन मजल्यांऐवजी पाचमजली बांधा; आमची हरकत नाही. मात्र, एकाही झाडाला हात लावू देणार नाही.
----------------------------------------
मग मुलांनी खेळाचे कुठे? : माजी नगरसेवक शशिकांत पाटील
बांधकाम करताना मोकळी जागा सोडावी लागते. झाडे असणारा परिसर मोकळा ठेवून रिकाम्या जागेत बांधकाम केल्यास मार्ग निघू शकतो. येथील मुलांना खेळण्यासाठी एकमेव मैदान असून, येथेही बांधकामाची खरमाती टाकली आहे. मग मुलांनी खेळायचे कुठे?
---------------------------------------
पोलिसांना घरे चांगली मिळाली पाहिजेत. त्यांच्या घरांना विरोध नाही. झाडांचा परिसर सोडून बांधकाम करता येते. तरीही झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्यास जेसीबीच्या आडवे पडू. आमच्यावर गुन्हा नोंद झाला तरी आता मागे हटणार नाही. मैदानालाही सुरक्षा भिंत घालण्यात येत आहे. परिसरातील मुले मैदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे झाडे आणि मैदानासाठी लढा उभारू.
- मिलिंद यादव
----------------------------------------------------------
पोलीस लाईनसंदर्भात थोडक्यात
नवीन बांधकाम - तीन अपार्टमेंट
फ्लॅटची संख्या- १९२