चिपरी ग्रामस्थांची आक्रमक : कचरा टाकू देणार नाही;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 01:04 AM2017-01-04T01:04:00+5:302017-01-04T01:04:00+5:30
आत्मदहनाचा इशारा; नगरपालिकेला शोधावी लागणार पर्यायी जागा जयसिंगपूरच्या कचऱ्याचा प्रश्न चिघळला
जयसिंगपूर : जयसिंगपूरचा कचरा कोणत्याही परिस्थितीत चिपरी येथील खाणीत टाकू देणार नाही, असा इशारा देत या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींना दिला. त्यामुळे जयसिंगपूर शहराच्या कचऱ्याचा प्रश्न आणखीनच चिघळला असून संकलन केलेला कचरा टाकायचा कोठे हा प्रश्न पालिकेसमोर आहे.
मंगळवारी दुपारी दीड वाजता नगरपालिका हद्दीतील कचरा टाकण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याबाबत पालिकेची विशेष सभा बोलाविली होती. सभेत कचरा प्रश्नावरून मोठा ऊहापोह झाला. सभेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने सायंकाळी चिपरी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात जयसिंगपूर पालिका पदाधिकारी व चिपरी ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. ३१ डिसेंबरपर्यंत कचरा टाकण्याची मुदत जयसिंगपूर पालिकेला दिली होती. त्यामुळे १ जानेवारीपासून चिपरीच्या शेतकऱ्यांनी जयसिंगपूर पालिकेच्या कचरा डेपोसमोर चर पाडून रस्ता बंद केला.
जयसिंगपुरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर बैठकीत सरपंच सुरेश भाटिया म्हणाले, चिपरी ग्रामपंचायतीमध्ये आजपर्यंत कचरा टाकण्याबाबतचा ठराव झाला नाही. कचरा डेपोच्या परिसरात पंचनामा केलेला आहे. त्यात गावापासून चार किलोमीटर अंतर असल्याचे दाखवून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी गडबडीत निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे यापुढे या खणीत कचरा टाकू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रश्न दोन महिन्यांत सोडविणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रश्न सोडविणाऱ्यांनी आज बैठकीलाही उपस्थिती लावली नाही.
कचऱ्याच्या जागेचे कंपाऊंडही बेकायदेशीर आहे, असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांनी त्याचा निषेध नोंदविला. नगरसेविका अॅड. सोनाली मगदूम म्हणाल्या, पहिल्या सभेतच कचऱ्याचा प्रश्न आमच्यासमोर आला आहे. आश्वासने देऊन जे घरात बसले त्यांना फिकीर नाही. दहा वर्षांत कचरा व्यवस्थापनाचे नियोजन का झाले नाही, असा जाब विचारणार आहोत, तर कचरा डेपोच्या कंपाऊंडसाठी साडेचार कोटींच्या रकमेचे काय झाले. याची चौकशीही करणार आहोत. चिपरीकरांचा प्रश्न लवकर निकालात काढू, असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष माने यांच्यासह नगरसेवकांनी कचरा डेपोची पाहणी केली. बैठकीस पक्षप्रतोद बजरंग खामकर, नगरसेवक पराग पाटील, शीतल गतारे, शैलेश चौगुले, मुक्ताबाई वगरे, मुख्याधिकारी हेमंत निकम, उपसरपंच अभय पाटील, प्रवीण देसाई, अभिजित पाटील, राजाराम माने, रजपूत उपस्थित होते.
तीन तास वादळी सभा : नगरसेवकांकडून प्रशासन धारेवर
कचरा प्रश्नावरून पालिकेत झालेल्या विशेष सभेत दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पहिलीच सभा तीन तास वादळी ठरली. उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक शिवाजी कुंभार, आस्लम फरास यांनी विस्तृत माहिती मांडून सहकार्याची भूमिका मांडली. नगरसेविका सोनाली मगदूम, सर्जेराव पवार, शैलेश चौगुले, पराग पाटील यांनी कचऱ्याप्रश्नी समन्वयातून मार्ग काढण्याची मागणी केली. नगराध्यक्षा नीता माने यांनी तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांसह दोन्ही आघाड्यांचे पक्षप्रतोद व नगरसेवक यांचे शिष्टमंडळ चिपरी ग्रामस्थांना भेटण्याबाबत निर्णय घेतला.
चिपरीकर सहकार्य करा
नगराध्यक्ष डॉ. नीता माने म्हणाल्या, कचरा प्रश्न निकालात काढण्यासाठी तत्काळ नियोजन केले जाणार आहे. यासाठी चिपरीकरांनी पालिकेला सहकार्य करावे. चिपरीच्या शेतकऱ्यांवर दबाव आणणार नाही. कचऱ्याच्या प्रश्नासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.