उद्यमनगरात क्लोरिन गळती
By admin | Published: November 4, 2015 01:10 AM2015-11-04T01:10:04+5:302015-11-04T01:10:04+5:30
वृद्धेचा मृत्यू : ४० जणांना बाधा; आठ अत्यवस्थ; कारखान्यात दुपारी दुर्घटना; तिघांना अटक
कोल्हापूर : दुरुस्तीसाठी आणलेल्या सिलिंडरमधील क्लोरिन गळतीमुळे शिवाजी उद्यमनगरमध्ये दुपारी पावणेदोन वाजता एकच हाहाकार उडाला. हा क्लोरिन हवेतून सुमारे दोनशे मीटर परिसरात पसरल्याने अनेकजण घरातच गुदमरून बेशुद्ध पडले, अनेकांना उलट्या होऊ लागल्या, रस्त्यावरून जाणारे नागरिक चक्कर येऊन पडले. या गॅसची बाधा झाल्याने लक्ष्मीबाई पांडुरंग माने (वय ६०, उद्यमनगर, कोल्हापूर ) या वृद्धेचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी एस. एस. एंटरप्राईजेस कारखान्याच्या मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
काही वेळातच हा परिसर निर्मनुष्य झाल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या सात जवानांंसह परिसरातील एकूण ४० जणांना याची बाधा झाली. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी आठजणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील काही नागरिकांनी सुमारे अडीचशे मीटर परिसरात घरातील उर्वरित नागरिकांना बाहेर काढले. त्यामध्ये अनेकजण झोपलेल्या स्थितीत बेशुद्ध पडले होते. सुमारे दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही गॅस गळती रोखण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली.
येथील शिवाजी उद्यमनगर या मिनी औद्योगिक वसाहत, नागरी क्षेत्रामध्ये मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाशेजारी एस. एस. एंटरप्राईजेस या वेल्डिंग कारखान्यात ही गॅस गळतीची दुर्घटना घडली.
दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास एस. एस. एंटरप्राईजेसचे मालक प्रशांत भोई-कांबळे त्यांच्या सूरज गाडे आणि सागर गाडे या दोन कर्मचाऱ्यांसह आपल्या कारखान्यात काम करीत होते. काहीतरी कामांसाठी मालक प्रशांत भोई हे शेजारील कारखान्यात गेले. त्याचवेळी अज्ञात दोघांनी गॅस सिलिंडर कारखान्यानजीक दुरुस्तीसाठी आणले होते. त्या सिलिंडरमधून गॅस गळती मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने ते सिलिंडर कारखान्याबाहेर ठेवून त्या दोघांनी पलायन केले. त्याचेवेळी कारखान्याचे मालक प्रशांत भोई तेथे आले. त्यांनी दोन कामागारांच्या सहायाने शेजारील खासगी बोअरिंगचे पाणी घेऊन त्याचा सिलिंडरवर मारा केला; पण गॅस गळती कमी होण्याऐवजी जास्तच होऊ लागल्याने मालकांसह तिघांनीही तेथून पलायन केले.
दरम्यान, सिलिंडरमधील क्लोरीन गॅस परिसरात हवेतून पसरला. त्यामुळे परिसरात क्लोरीन गॅसचा उग्र वास येऊ लागल्याने अनेकजण गुदमरून गेले. घरात झोपलेल्या अवस्थेतच अनेकजण बेशुद्ध पडले. वयोवृद्ध लोकांना घरातून बाहेर पडता आले नाही. काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव झाल्याने अनेकजण घरातून बाहेर पडून रस्त्यावरून सैरभैर पळू लागले. काही वेळातच रस्ता निर्मनुष्य झाला. रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरिकही श्वास गुदमरल्याने खोकतच रस्त्यावर पडू लागले. तर काहींच्या तोंडाला फेस आला, तर अनेकांच्या डोळे चुरचुरू लागले. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन गळती झालेल्या सिलिंडरवर पाण्याचा मारा करून गॅस गळती थांबविण्याचा प्रयत्न केला; पण ही गळती थांबण्याऐवजी त्या सिलिंडरचा मुख्य व्हॉल्व्ह उडाल्याने मोठा आवाज होऊन त्यातून हिरव्या रंगाचा गॅस मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागला. त्यावेळी ब्रिदिंग आॅपरेटिंग सेटच्या सहायाने मास्क लावून ही गॅस गळती रोखली.
त्यानंतर हा गॅस परिसरात सुमारे २५० मीटरपर्यंत पसरला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तोंडाला रुमाल बांधून त्यांनी धाडसाने घटनास्थळानजीकच्या घरांची तपासणी करून गुदमरून बेशुद्धावस्थेत पडलेल्यांना घरातून बाहेर काढले. जखमींना रुग्णवाहिकेतून सरकारी रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच आणखी चार अग्निशमन दलाच्या गाड्या आल्याने त्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ब्रिदिंग आॅपरेटिंग सेट वापरून परिसरातील घरात कोणी शिल्लकराहिले आहे का? याची तपासणी केली. त्यावेळी घटनास्थळी जाणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. यावेळी परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
शिवाजी उद्यमनगर हे मिनी औद्योगिक क्षेत्र असले, तरीही हे ठिकाण शहराच्या मध्यभागी भर लोकवस्तीत आहे. या कारखान्यात वेल्डिंगसाठी कार्बाईन वायूचा वापर केला जातो; पण येथे गॅस गळती झालेला वायू हा अमोनिया असल्याची चर्चा होती. त्यामुळे या वायूचे सिलिंडर येथे कशासाठी आणले? याची चौकशी करून कारवाई करावी, अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. काही वेळाने तो वायू क्लोरीन असल्याचे सिद्ध झाले.
साखरेमुळे तीव्रता कमी
परिसरात मदतकार्य राबविताना अनेक मदतनिसांनाच श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी व परिसरातील काहींनी उपस्थितांना साखर वाटून ती खाण्यास भाग पाडले. या साखरेमुळे वायू बाधा होण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे श्वास घेण्यातही तसेच घशाचा अनेकांचा त्रास कमी होण्यास मदत झाली.
तोंडाला फेस, खोकला, श्वास घेताना अडचणी
गॅस गळती झाल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या डोळ्यात चुरचुरू लागले. श्वास घेताना त्रास होऊन प्रत्येकाच्या घशात खवखवून खोकला येऊ लागला. अनेकांच्या तोंडाला फेस आला, तर काहींना उलट्या झाल्या. त्यामुळे परिसरात अनेकांनी तोंडाला रुमाल बांधले होते.
४इतकी मोठी दुर्घटना होऊनही हे सिलिंडर कोणाचे याबाबत मात्र एस. एस. एंटरप्राईजेसचे कारखाना मालक प्रशांत भोई-कांबळे यांनीही हात झटकले. ते म्हणाले, मी शेजारील कारखान्यात गेलो होतो, त्यावेळी आपल्या कारखान्यात सूरज गाडे आणि सागर गाडे हे दोन कर्मचारी काम करीत होते. याचवेळी एका मोटारसायकलवरून एक ३५ वर्षीय व्यक्ती व एक मुलगा हे सिलिंडर घेऊन आले.
४त्यांनी हे सिलिंडर कारखान्याच्या दारातच उतरले. त्यातून गॅस गळती होऊ लागल्याने ते दुरुस्तीसाठी आणले असावे; पण हे सिलिंडर गाडीवरून जमिनीवर ठेवताच त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने संबंधितांनी तेथून पलायन केले. त्यामुळे हे सिलिंडर कोणाच्या मालकीचे आहे, हे मला माहीत नसल्याचे सांगून प्रशांत भोई यांनी हात झटकले.
ही दुर्घटना घडली त्यावेळी सिलिंडरमधून गॅस गळती होत होती. पहिल्या आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीत फक्त एकच ब्रिदिंग आॅपरेटिंग सेट असल्याने तो सेट अंगावर चढवून कांता बांदेकर या अग्निशमन दलाच्या जवानाने गळती सुरू असलेल्या सिलिंडरवर पाण्याचा मारा सुरू केला.
‘त्या’ गळतीची आठवण
कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये क्लोरिन टाकीला चार महिन्यांपूर्वी गळती लागली होती. यावेळी महापालिकेचे चार कर्मचारी बेशुद्ध पडले होते. या घटनेची आठवण पुन्हा एकदा जागी झाली.
परिसरातील झाडांची
पानेही कोमेजली
क्लोरिन गळतीचा परिणाम कारखाना परिसरातील झाडांवरही झाला होता. या गॅसची तीव्रता इतकी होती की, यामुळे अनेक झाडांची पानेही कोमेजली होती.
(आणखी छायाचित्रे ४ वर)
गळती कमी होण्याऐवजी सिलिंडरचा व्हॉल्व्ह उडून बाजूला पडल्याने त्यातून हिरव्या रंगाचा गॅस बाहेर येऊ लागला; पण बांदेकर याने धाडसाने उडालेला व्हॉल्व्ह पुन्हा घेऊन त्या सिलिंडरला घालून तो हाताने आवळला. त्यामुळे गॅस गळती कमी झाली. त्याच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.