चॉकलेट.... मुलगी... झाली मारहाण... कारण अजून गुलदस्त्यातच... कृषी महाविद्यालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:05 PM2020-02-13T13:05:39+5:302020-02-13T13:20:08+5:30
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाविद्यालय प्रशासन हे प्रकरण संयमाने हाताळत आहे. नेमके काय कारण घडले याविषयी माहिती न देता, प्रशासनाकडून गोपनियता बाळगली आहे.
कोल्हापूर : येथील कृषी महाविद्यालयात बुधवारी सायंकाळी एका विद्यार्थ्याला कॅम्पसच्या बाहेरील मुलांकडून जोरदार मारहाण करण्यात आली. विद्यार्थ्याला मारहाण केल्याच्या कारणाने गुरुवारी सकाळी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले . बाहेरील मुले आत येतातच कसे व मारहाण का करतात असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची महाविद्यालयानेही गांभिर्याने दखल घेतली असून सकाळ सत्रात विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाची चर्चा सुरु उशिरापर्यंत सुरु होती. दुसऱ्या बाजूला काल चॉकलेट डे असल्याने संबधित एका विद्यार्थ्याने एका मुलीला चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. याच कारणातून मुलीच्या नातेवाईकांनी त्या विद्यार्थ्याला मारहाण केली असावी अशी माहिती चर्चेतून पुढे आली. मात्र याविषयी अद्याप खरे कारण अद्याप पुढे आले नाही.
काही मुलांनी यासंबंधी जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणखी काही मुले महाविद्यालय परिसरात आले असता, पुन्हा वातावरण तंग झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाविद्यालय प्रशासन हे प्रकरण संयमाने हाताळत आहे. नेमके काय कारण घडले याविषयी माहिती न देता, प्रशासनाकडून गोपनियता बाळगली आहे.