स्वत:चे समाधान ज्या क्षेत्रात तेच करिअर निवडा : दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:01 AM2020-03-13T11:01:55+5:302020-03-13T11:03:57+5:30
एज्युकेशन गुरूचे कुणाल पाटील म्हणाले, भविष्यातील संधीचा विचार करून अभ्यासक्रम निवडावा. आॅस्ट्रेलिया, कॅनडा, आदी परदेशांतील शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगितली.
कोल्हापूर : प्रत्येकाच्या यशाच्या व्याख्या जरी वेगळ्या असल्या तरी स्वत:चे समाधान ज्या क्षेत्रात आहे, त्याच क्षेत्रात करिअर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
शाहू स्मारक भवन येथे बुधवारी एज्युकेशन गुरू व एमबर्क यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिडिफाईन २०२०’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचे लोकमत मीडिया पार्टनर होते.
देसाई म्हणाले, करिअर निवडताना विद्यार्थ्यांचा निर्णय हा मित्र-मैत्रिणींच्या निर्णयाला साजेसा असावा, असे वाटते. यात तुमचा आतला आवाज काय सांगतो, याकडे विद्यार्थी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांनी आधी स्वत:ला नीट ओळखणे आवश्यक आहे. ‘स्व’ची नीट ओळख झाल्यानंतर करिअरची निवड करा. काही वेळेस अपयश येते; परंतु खचून न जाता यश मिळविण्यासाठी सकारात्मक विचार कायम मनाशी बाळगून सातत्याने अभ्यास सुरू ठेवा.
मार्गदर्शन करताना शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञानचे विभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉर्इंट येत असतो. तो ओळखून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. ज्या क्षेत्रात करिअर करावयाचे आहे, ते ध्येय निश्चित करून त्याचा पाया पक्का करा. परदेशात शिक्षणाच्या व संशोधनांच्या अनेक संधी आहेत. त्यात आपल्याला स्वत:ला उत्तम इंग्रजी येणे आवश्यक आहे.
याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. जयदीप बागी यांनी ‘परदेशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरच्या वाटा’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच कॅशस्ट्रोल इंडिया मुंबईचे वाणिज्य व्यवस्थापक गौरव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
एज्युकेशन गुरूचे कुणाल पाटील म्हणाले, भविष्यातील संधीचा विचार करून अभ्यासक्रम निवडावा. आॅस्ट्रेलिया, कॅनडा, आदी परदेशांतील शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगितली.
शीतल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कुणाल पाटील यांनी आभार मानले. यावेळी निवृत्त प्राध्यापक डॉ. अरुण भोसले, शिवाजी विद्यापीठाचे सेवानिवृत्त वित्त व लेखा अधिकारी डॉ. बी. एस. पाटील, गौरव सावंत, डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेत मिळाला दृष्टिक्षेप
- - भविष्यातील संधी
- - संधीची उपलब्धता
- - स्पर्धात्मक युगात वावरण्याचा मंत्र
- - यशस्वी मुलाखतीचे तंत्र