जोडीदाराची विवेकी निवड करा -कृष्णात कोरे - थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:46 AM2019-02-01T00:46:43+5:302019-02-01T00:50:31+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने १२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी ‘आंतरराष्ट्रीय प्रेम दिवस’ या कालावधीत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हे युवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने समितीचे राज्य युवा कार्यवाह कृष्णात कोरे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने १२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी ‘आंतरराष्ट्रीय प्रेम दिवस’ या कालावधीत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हे युवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने समितीचे राज्य युवा कार्यवाह कृष्णात कोरे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...
प्रश्न : जोडीदाराची विवेकी निवड हे अभियान राबविण्यामागील भूमिका काय?
उत्तर : जोडीदाराची निवड हा प्रत्येक युवक-युवतीच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. आपण शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत जसे गंभीर असतो, तसे जोडीदाराच्या निवडीबाबत मात्र आवश्यक तेवढे गंभीर नसतो. लग्न झाल्यावर आपोआप संसार करता येतो, असे म्हटले जाते. खरंतर हा समज चुकीचा आहे. या भ्रमामुळेच नात्यातील धुसफूस, घटस्फोट किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या रूपाने होणारे परिणाम विवाहित दाम्पत्यांसह दोन्ही कुटुंबांना आयुष्यभर भोगावे लागतात. जे थोडे लोक याविषयी सजग आहेत त्यांनाही त्यांच्यासाठी अनुरूप जोडीदार मिळण्याचे योग्य मार्ग आज सहज उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुला-मुलींना सजग करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
प्रश्न : सध्याच्या विवाह पद्धतीबद्दल तुमचे मत काय?
उत्तर : समाजात जोडीदार निवडण्याचे दोनच मार्ग रूढ आहेत पहिला म्हणजे कांदेपोहे करून पाहण्याचा पारंपरिक मार्ग आणि दुसरा म्हणजे प्रेमविवाह. पाहण्याच्या १५-२० मिनिटांच्या कार्यक्रमात अनुरूप जोडीदार मिळेलच याची शक्यता खूप कमी असते; मग मिळालेला जोडीदार कसा योग्य आहे, हे स्वत:ला आणि समाजाला पटविण्यात आयुष्य निघून जाते. अशा कार्यक्रमात फक्त मुलीचे शारीरिक सौंदर्य आणि मुलाची आर्थिक स्थिती याचाच विचार केला जातो. प्रेमविवाहाचा पर्याय आजही पालक आणि समाजाला मान्य असतोच असे नाही. अनेकदा अविचारातून केलेले हे विवाहदेखील अयशस्वी ठरतात.
प्रश्न : जोडीदाराची विवेकी निवड ही संकल्पना काय आहे?
उत्तर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मांडलेल्या विचारांच्या आधारे या उपक्रमाची एक पंचसूत्री ठरविली आहे. ती म्हणजे प्रेम आणि आकर्षण समजून घेणे, बौद्धिक, भावनिक आणि मूल्यात्मक अनुरूपता पाहणे, हुंडा, पत्रिका आणि व्यसनांना नकार देणे, लग्न साधेपणाने करणे आणि आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाची शक्यता पडताळून पाहणे. याआधारे युवक, युवती आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला जातो. कोणत्याही पद्धतीने जोडीदार निवडण्यापूर्वी एकमेकाला पुरेसा वेळ देऊन, समजून घेऊन परिचयोत्तर विवाह करण्याचा अधिक योग्य पर्याय निवडण्याचा सल्ला दिला जातो.
प्रश्न : जोडीदार निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहीजे?
उत्तर : जोडीदार निवडीच्या रूढ पद्धतींच्या पलीकडे जाऊन युवक-युवतींची परस्पर संमती, त्या दोघांचीही लग्नानंतर येणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक जबाबदाºया पेलण्याची क्षमता, आवडी-निवडी, स्वभाव, व्यक्तिगत आणि कौटुंबिक विचारसरणी, भविष्यातील स्वप्ने याविषयीचे दृष्टिकोन यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. व्यसन, हुंडापद्धती आणि जन्मपत्रिका पाहणे या बाबींना स्पष्टपणे नकार देता आला पाहिजे. हे सर्व करताना कुणा एकाची फसवणूक होणार नाही, हे महत्त्वाचे. एकमेकांच्या आरोग्याची सद्य:स्थिती आणि भविष्यात त्यानुसार काळजी किंवा उपचार घेता यावेत आणि सुखी संसार करता यावा यासाठी लग्न ठरवण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी या दोघांचीही आरोग्य तपासणी झाली पाहिजे. ही तपासणी केवळ एच.आय.व्ही. किंवा लैंगिक आजार जाणून घेण्यासाठी नाही, तर एकूणच आरोग्यविषयक स्थिती जाणून अधिक सजग, निरोगी सहजीवन जगण्यासाठी महत्त्वाची आहे.
प्रश्न : सुखी संसाराचे सूत्र कोणते?
उत्तर : अपेक्षाभंग झाला की संसाराच्या चौकटीला तडे जायला सुरुवात होते. लग्नानंतर त्या दोघांना दोन्ही कुटुंबांसोबत जे जीवन जगायचे आहे तो केवळ संसार न ठरता ते परस्परांचे भावजीवन जपत फुलविलेले सहजीवन ठरावे. त्यासाठी केवळ पती-पत्नीमध्येच नव्हे, तर सगळ्यांच नात्यांमध्ये खºया अर्थाने समानता असली पाहिजे. लग्न करणाºया दोघांसह दोन्ही कुटुंबातील प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि प्रत्येकाचा स्वतंत्र अवकाश मान्य करत विचार, निर्णय आणि कृतीच्या पातळीवर संवाद आणि समानता असणे गरजेचे आहे.
प्रश्न : या अभियानाला मिळणारा प्रतिसाद कसा आहे?
उत्तर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या विषयावर महाराष्ट्रभर ३० हून अधिक संवादशाळा घेतल्या आहेत. या कार्यशाळा लग्नाळू तरुण-तरुणींसोबतच त्यांच्या पालकांमध्येही लोकप्रिय झाल्या आहेत. यानिमित्ताने विवाहातील विफलता आणि अपयश कमी होण्याच्यादृष्टीने एक नाव पर्याय आम्ही समोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि तो यशस्वी होत आहे.
- इंदूमती गणेश .