चोपडीत अपघातात दहावीचा विद्यार्थी ठार
By admin | Published: February 28, 2016 12:38 AM2016-02-28T00:38:22+5:302016-02-28T00:38:22+5:30
दोघे गंभीर : निरोप समारंभानंतर दुर्घटना
मणदुरे : शाळेतील निरोप समारंभ आटोपून घराकडे निघालेल्या दहावीतील तीन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जीपने धडक दिली. या अपघातात एकजण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. पाटण तालुक्यातील चोपडी हद्दीत शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
रमेश गणेश मोळावडे (वय १६, रा. चोपडी) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे, तर गंभीर जखमी असलेल्या संजय विश्वनाथ जाधव व सुयश दादासाहेब जाधव (दोघेही रा. चोपडी) या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे गावोगावच्या शाळांमध्ये सध्या दहावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होत आहे. बेलवडेतही न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवारी होता. यात दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बेलवडेसह चोपडीतील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात. समारंभासाठी चोपडीतील रमेश, संजय व सुयश हे तिघे शाळकरी मित्र दुचाकी (एमएच १० ए ६४८७)वरून शाळेत आले होते. समारंभ आटोपल्यानंतर पुन्हा हे तिघे दुचाकीवरून गावी चोपडीला निघाले. चोपडीच्या हद्दीत ‘लंगडाचा वाडा’ नावच्या परिसरात आले असता समोरून आलेल्या वडाप जीपची (एमएच १० सी २७२२) दुचाकीला जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही दूरवर फेकले गेले. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रमेशचा मृत्यू झाला, तर परिसरातील ग्रामस्थांनी जखमी सुयश व संजय यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. अपघाताची नोंद पाटण पोलिसांत झाली आहे.
रमेशने तोडली अर्ध्यावर दोस्ती
चोपडी गावातील रमेश मोळावडे, संजय जाधव, सुयश जाधव हे तिघे शाळेसाठी नेहमीच एकत्र जात असत. अभ्यासही ते एकत्र करत. शुक्रवारी निरोप समारंभ आटोपून ते तिघे गावाकडे निघाले होते. यावेळी झालेल्या अपघातात रमेशचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे रमेशने दोस्ती अर्ध्यावर सोडल्याची भावना मित्र व्यक्त करीत होते.