मद्यपी पोलिसाला चोप
By admin | Published: May 20, 2016 01:17 AM2016-05-20T01:17:49+5:302016-05-20T01:18:14+5:30
मिरजकर तिकटी चौकातील घटना : कपडे फाटेपर्यत मारहाण
कोल्हापूर : मद्यप्राशन करून फुकटचे खाणाऱ्या पोलिसाला नागरिकांनी कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी रात्री उशिरा मिरजकर तिकटी चौकात घडला. नागरिकांनी त्याची चारचाकी गाडीही काढून घेतली होती. रात्री उशिरा त्याला नागरिकांनीच जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
एक पोलिस मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आपल्या मारुती मोटारीतून रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी येथील चौकात आला. त्याने चौकातील हातगाडीवर आइस्क्रीम खाल्ले; पण पैसे न देताच जाताना आइस्क्रीम हातगाडीचालकाने त्याच्याकडे पैसे मागितले असता ‘त्या’ मद्यपी पोलिसाने त्या हातगाडीचालकाला शिवीगाळ करून त्याच्या गाडीवर लाथा-बुक्क्या मारून धिंगाणा घातला. गोंधळ माजल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी या पोलिसाला समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्याने नागरिकांनाही नशेत शिव्या दिल्याने ते संतप्त झाले. त्यांनी या फुकटखाऊ पोलिसास मारहाण केली. त्यावेळी त्याने आपण पोलिस असल्याचा धाक दाखविला. त्यानंतरही नागरिकांनी त्याला कपडे फाटेपर्र्यंत बेदम चोप दिला.
चौकात गोंधळ वाढल्याने परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे व अशोकराव पोवार यांनी त्या पोलिसाची नागरिकांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर जुना राजवाडा पोलिसांत फोन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी आले व ‘त्या’ मद्यपी पोलिसाला ताब्यात घेऊन गेले. संबंधित पोलिस शहरातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.
दरम्यान, त्या पोलिसाची पांढऱ्या रंगाची मारुती गाडी चौकातच उभी होती. नागरिकांनी त्या गाडीची तपासणी केली असता त्या पोलिसाचा ड्यूटीवरील गणवेश तसेच काचेजवळ ‘पोलिस’ असे लिहिलेली पाटी सापडली. त्यामुळे संतप्त नागरिकांकडून त्या मोटारीचे नुकसान होऊ नये म्हणून पुन्हा पोलिसांना पाचारण करून ती मोटार नेण्यास भाग पाडले.(प्रतिनिधी)
भांडणे सोडविण्यासाठी पाठविल्या दोन महिला पोलिस!
जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्रीच्या वेळी पुरुष पोलिस अशा प्रसंगी कदाचित नसावेत, असा अनुभव याप्रसंगी नागरिकांना आला. पोलिसाला बेदम मारहाण केल्यानंतर साळोखे व पोवार यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फोन केल्यानंतर काही वेळात घटनास्थळी दोन महिला पोलिस आल्या. विशेष म्हणजे, त्या दोन महिला पोलिसांनी नागरिकांनाच दमदाटी करण्यास प्रारंभ केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून बोलाविण्यात आले.