चौंडेश्वरी बँक इतिहासजमा होण्याच्या मार्गावर
By admin | Published: August 7, 2015 10:47 PM2015-08-07T22:47:27+5:302015-08-07T22:47:27+5:30
प्रक्रिया अंतिम टप्प्यात : पुणे जनता बँकेत होणार विलीनीकरण; इचलकरंजी शहरातील नववी सहकारी बँक
इचलकरंजी : येथील चौंडेश्वरी सहकारी बॅँकेच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ही बॅँक आता पुणेस्थित जनता सहकारी बॅँकेत सामावली जाईल. शहरातील सहकारी चळवळीमधील नववी बॅँक आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. चौंडेश्वरी बॅँकेचे पुणे जनता बॅँकेत विलीनीकरण करण्यासाठी उद्या, रविवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
साधारणत: ३५ वर्षांपूर्वी स्थापित झालेली चौंडेश्वरी सहकारी बॅँक प्रामुख्याने देवांग कोष्टी समाजाची संस्था म्हणून ज्ञात आहे. बॅँकेचे सुमारे १५ हजारांहून अधिक सभासद आहेत. एकेकाळी बॅँकेकडे ७० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. इचलकरंजीत तीन, कोल्हापूर येथे दोन, सांगली, कऱ्हाड, जयसिंगपूर व गडहिंग्लजमध्ये प्रत्येकी एक, असा या बॅँकेचा शाखा विस्तार आहे. बॅँकेचे भागभांडवल दोन कोटी ७४ हजार आहे. बँकेकडे १९.३२ कोटींच्या ठेवी असल्या तरी थकीत व्याज १०.६० कोटी रुपये आहे, तर बॅँकेला १४.५६ कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. अशा चौंडेश्वरी बॅँकेवर वर्षभरापासून रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक निर्बंध घातले आहेत.
चौंडेश्वरी बॅँकेने कर्जपुरवठा करताना सक्षम व्यक्ती किंवा व्यवसायास आर्थिक पुरवठा केला नाही. काही कर्जांचे नूतनीकरण (रिन्युअल) करताना व्याजासह कर्जाचे नूतनीकरण केले. अन्य बॅँकांमध्ये थकीत असलेली काही कर्ज खाती चौंडेश्वरी बॅँकेकडे घेतली. अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने एकेकाळी सक्षम असलेली बॅँक आता कमकुवत झाल्याची चर्चा आहे.यापूर्वी चौंडेश्वरी बॅँकेचा विलीनीकरणाचा प्रस्ताव ‘समृद्धी’कडे होता. मात्र, तो बारगळला. आता पुणे जनता बॅँकेने विलीनीकरणाचा विचार करताना एप्रिलमध्ये चौंडेश्वरी बॅँकेस भेट दिली आणि वस्तुस्थितीची पाहणी केली होती. पुणे जनता बॅँकेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत चौंडेश्वरी बॅँक विलीन करून घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. आता चौंडेश्वरी बॅँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा
उद्या बोलाविण्यात आली आहे. बॅँकेच्या प्रधान कार्यालयात सकाळी दहा वाजता होणाऱ्या या सभेत चौंडेश्वरी बॅँकेचे पुण्याच्या जनता सहकारी बॅँकेत विलीनीकरण करण्यास मान्यता देण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. (प्रतिनिधी)
नऊ बॅँका इतिहासजमा
इचलकरंजी हे वस्त्रोद्योगात अग्रेसर असणारे शहर असल्याने या शहराला होणारा सूतपुरवठा आणि येथून होणाऱ्या कापडाची विक्री देशातील अन्य प्रांताबरोबर होते. त्यामुळे येथे मोठी आर्थिक उलाढाल होते.
त्याचबरोबर उद्योगधंद्यांच्या वाढीसाठीसुद्धा अर्थसहाय लागते. म्हणून स्थानिक बॅँकांची संख्या इचलकरंजीत वाढली.
मात्र, काही तरी गैरव्यवहार व कामकाजातील चुकांमुळे शिवनेरी, अर्बन, कामगार, पीपल्स, जिव्हेश्वर, लक्ष्मी-विष्णू, साधना, महिला अशा बॅँका आता लयाला जात आहेत. तशी चौंडेश्वरी बॅँकसुद्धा विलीन होऊ लागली आहे.