नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधवांची विशेष प्रार्थना; सुट्टीमुळे शहर फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:07 PM2019-12-25T17:07:52+5:302019-12-25T17:09:21+5:30
देशाची एकता, अखंडता कायम राहो व जगात शांतता नांदो, अशी प्रार्थना करीत व विविध सामाजिक उपक्रम राबवीत नाताळचा सण बुधवारी मोठ्या धार्मिक वातावरणात व उत्साहात ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. शहरासह जिल्हाभरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या.
कोल्हापूर : देशाची एकता, अखंडता कायम राहो व जगात शांतता नांदो, अशी प्रार्थना करीत व विविध सामाजिक उपक्रम राबवीत नाताळचा सण बुधवारी मोठ्या धार्मिक वातावरणात व उत्साहात ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. शहरासह जिल्हाभरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या.
कॅरोल गायनाची रात्रभर सुरू असलेली धूम, शहरातील विविध चर्चवर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, विविध कार्यक्रमांची रेलचेल, नवनवीन वस्त्रे परिधान करून प्रार्थनेसाठी आलेले ख्रिस्ती बांधव एकमेकांना देत असलेल्या शुभेच्छा अशा भारावलेल्या वातावरणात चर्च आणि परिसरात जोशपूर्ण उत्साही वातावरणात प्रभू येशूचा जन्मदिन साजरा करण्यात आला.
शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्च, होली इव्हॅँजलीस्टस चर्च, आॅल सेंट्स चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज ख्रिश्चन चर्च यांसह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये विशेष भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून नाताळची लगबग जिल्हाभरात सुरू होती.
तीन दिवसांपूर्वी कॅरोल गायनाची सुरुवात झाली. क्वायर गु्रप घरोघरी जाऊन नाताळची गाणी गात होते. बुधवारी मध्यरात्री रात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करून नाताळ सणाचे स्वागत करण्यात आले. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून नाताळच्या भक्ती उपासनेला सुरुवात झाली.