ख्रिश्चन धर्मगुरू फादर ऑगस्टीन फर्नांडीस यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:57 PM2023-07-25T23:57:11+5:302023-07-25T23:57:22+5:30
गडहिंग्लजमध्ये घेतला अखेरचा श्वास, बेळगावांत होणार अंत्यसंस्कार
राम मगदूम, गडहिंग्लज (जि.कोल्हापूर): येथील संत अँथनी चर्चचे परिश प्रीस्ट, वरिष्ठ जेजवीट धर्मगुरू फादर ऑगस्टीन फर्नांडीस (55, मूळ संगरगाळी, ता खानापूर जि.बेळगांव) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. बुधवारी दुपारी ३.३० वाजता त्यांच्यावर बेळगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. बुधवारी (२६) सकाळी १० वाजता येथील चर्चमध्ये मिस्सा बलिदान (प्रार्थना) होईल. यावेळी सिंधूदुर्ग प्रांताचे बिशप ऑलविन बरेटो यांच्या उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३.३० वाजता बेळगावमध्ये कॅथेड्रल येथे मिस्सा बलिदान (प्रार्थना) फातिमा होईल. त्यानंतर क्लब रोड येथील ख्रिश्चन दफन भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
फादर ऑगस्टीन यांच्या पुढाकारानेच खानापूर येथील मिलाग्रीस सायबीन चर्च, गडहिंग्लजचे सेंट अँथनी चर्च आणि गोव्यातील बागा येथील रिटरीट हाऊसचे बांधकाम झाले आहे. महिन्यापूर्वीच त्यांची गडहिंग्लजला बदली झाली होती. बिशप डेरिक फर्नांडिस, गोवा जेजवीट प्रांताचे प्रमुख फादर रोलंड कोयलो व जेजवीट हाऊसचे रेक्टर फादर सायमन फर्नांडीस आणि बेळगांव, खानापूर तसेच गोव्यातील ख्रिस्ती बांधवांनी फादर फर्नांडीस यांच्या अकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.