चुयेकर, हत्तरकींच्या वारसदारांना डच्चू

By admin | Published: December 27, 2014 12:15 AM2014-12-27T00:15:15+5:302014-12-27T00:18:54+5:30

गोकुळ दूध संघ : ‘स्वीकृत’बरोबर आगामी पॅनेलमध्येही संधी अशक्य; संचालकांतील अंतर्गत राजकारण

Chukekar, dropped to the heirs of the latter | चुयेकर, हत्तरकींच्या वारसदारांना डच्चू

चुयेकर, हत्तरकींच्या वारसदारांना डच्चू

Next

राजाराम लोंढे- कोल्हापूर  जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) संस्थापक स्व. आनंदराव पाटील-चुयेकर व ज्येष्ठ संचालक राजकुमार हत्तरकी यांच्या वारसांना विद्यमान संचालक मंडळात स्वीकृत करण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. दोन्ही नेत्यांचे निधन होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी त्यांच्या वारसांना संधी देण्यावर नेते व संचालक मंडळात एकमत झालेले नाही. संचालक मंडळ व नेत्यांमधील अंतर्गत राजकारण पाहता, संघाच्या आगामी निवडणुकीत पॅनेलमध्येही त्यांच्या वारसांना संधी मिळणे
अवघड असल्याचे बोलले जात आहे.
‘गोकुळ’चे शिल्पकार म्हणून आनंदराव पाटील-चुयेकर यांना सारा महाराष्ट्र ओळखत होता. त्यामध्ये तथ्यही आहे. संघाच्या घोडदौडीत पाटील-चुयेकर यांचे योगदान मोठे आहे, हे कोणीही नाकारत नाही. त्यामुळेच ‘गोकुळ’च्या निर्णय प्रक्रियेसह राजकारणात त्यांच्या शब्दाला वजन होते; पण अलीकडील दहा-पंधरा वर्षांत अंतर्गत राजकारणामुळे ते काहीसे बाजूला पडले होते. जिवंतपणी आपले स्मारक ‘गोकुळ’मध्ये उभे करावे, अशी त्यांची इच्छा होती; पण संचालक मंडळाला त्यांची इच्छा मरणानंतरही अद्याप पूर्ण करता आलेली नाही. राजकुमार हत्तरकी यांचेही संघाच्या वाटचालीत योगदान आहे. हत्तरकी यांचे २२ नोव्हेंबर २०१३ रोजी, तर चुयेकर यांचे १६ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले. संचालक मंडळात या दोन अनुभवी संचालकांची उणीव भासतेच; पण त्यांच्या वारसांच्या रूपाने संचालक मंडळात त्यांना प्रतिनिधित्व देण्याची संधी संस्थेच्या संचालकांना होती.
वर्ष झाले शशिकांत पाटील-चुयेकर व सदानंद हत्तरकी यांना संचालक मंडळात संधी देण्यावरून एकमत झाले नाही. शशिकांत पाटील यांच्याऐवजी आनंदराव पाटील यांच्या पत्नींना संधी द्यावी, अशीही काही दिवस चर्चा झाली. यासाठी काही ज्येष्ठ संचालक आग्रही होते; पण विविध कारणे पुढे करीत वेळ मारून नेण्याचे काम झाले. याबाबत नेत्यांमध्येच मतभिन्नता असल्याने ते शक्य होऊ शकले नाही.
आता त्यांच्या वारसांना संघाच्या आगामी निवडणुकीत संधी मिळेल अशी अपेक्षा आहे; पण अंतर्गत राजकारण पाहता सत्तारूढ पॅनेलमध्ये त्यांना संधी मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे ‘स्वीकृत’बरोबर पॅनेलमधूनही चुयेकर, हत्तरकी यांच्या वारसदारांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.
शाहूवाडीचे ज्येष्ठ नेते
आनंदराव पाटील-भेडसगावकर यांच्या निधनानंतरही त्यांच्या वारसदारांना स्वीकृतही केले नाही आणि त्यापुढील निवडणुकीत संधीही दिली नव्हती.

‘त्या’ शपथेचे काय?
तीन वर्षांपूर्वी संघाच्या सात माजी अध्यक्षांनी तिरूपती येथे जाऊन ‘बालाजी’च्या साक्षीने नेत्यांमध्ये काहीही मतभेद होऊ देत; पण एकत्रित राहण्याची शपथ घेतली होती. त्याची चर्चाही जिल्ह्यात जोरात होती; पण आता त्यातील दोन माजी अध्यक्षांच्या वारसांना स्वीकृत करून घेण्यासाठी कितीजणांनी प्रयत्न केले, ‘त्या’ शपथेचे काय झाले, अशी विचारणा आता त्यांच्या समर्थकांमधून होत आहे.

Web Title: Chukekar, dropped to the heirs of the latter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.