चौकशीच्या आश्वासनानंतर चर्च कौन्सिलचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:19 AM2020-11-19T11:19:23+5:302020-11-19T11:21:58+5:30
collcatoroffice, kolhapurnews जागा बळकावण्याच्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्यानंतर चर्च कौन्सिलने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत आंदोलन स्थगित केले.
कोल्हापूर : जागा बळकावण्याच्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्यानंतर चर्च कौन्सिलने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत आंदोलन स्थगित केले.
इंडियन कॅनेडियन प्रेसबिटेरियन मिशन हेच बोर्ड ऑफ फॉरिन मिशन असल्याचे भासवून चर्च कौन्सिलच्या काही मालमत्तांवर परस्पर दावा केला जात आहे. पन्हाळा भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकांनी तर कोणाचीही मागणी नसतानादेखील चर्च कौन्सिलचे नाव उताऱ्यावरून कमी करून मागणी नसतानाही सत्ताप्रकार बदलला आहे. या प्रकाराबद्दल न्यायालयातून स्थगिती आणूनदेखील आणि शासकीय पातळीवर वारंवार आवाज उठवूनही जागा बळकावण्याचे प्रकार सुरूच असल्याचा निषेध म्हणून कोल्हापूर चर्च कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. सामुदायिक आत्मदहनाचा इशाराही दिला.
आंदोलन सुरू झाल्यावर लगेचच जिल्हाधिकारी देसाई यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला बैठकीला बोलावले. बैठकीत जिल्हाधिकारी यांनी चौकशी लावून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्याने बेमुदत आंदोलनासह आत्मदहनाचा इशाराही मागे घेण्यात आला. आंदोलनात चर्च कौन्सिलचे चिटणीस जे. ए. हिरवे, प्रॉपर्टी कमिटी चेअरमन उदय बिजापूरकर, खजिनदार दीनानाथ कदम, प्रशासक श्रीनिवास चोपडे यांनी सहभाग घेतला.