बेळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:33+5:302020-12-23T04:22:33+5:30
तालुक्यात ठिकठिकाणी मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. दरम्यान, समर्थकांनी मतदान केंद्रांपासून ठरावीक अंतरावर उभे राहून मतदारांना मार्गदर्शन सुरू ...
तालुक्यात ठिकठिकाणी मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. दरम्यान, समर्थकांनी मतदान केंद्रांपासून ठरावीक अंतरावर उभे राहून मतदारांना मार्गदर्शन सुरू केले. उमेदवारांचे समर्थक केंद्रांच्या परिसरात उभे होते. दुपारच्या वेळी मतदानाचे बुथ रिकामे झाले होते; परंतु दुपारनंतर पुन्हा एकदा मतदारांचा उत्साह अधिकच वाढला, मतदानाची वेळ संपत आली त्यावेळी मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची रिक्षा आणि खासगी वाहनांची सोय उपलब्ध करून देण्यात होती. त्यामुळे वयोवृद्ध मंडळीही मतदानासाठी सरसावली होती. तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारयादीचा घोळ झाल्याचाही प्रकार निदर्शनास आला. मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र मतदारयादी उपलब्ध नसल्याच्या तक्रारीदेखील ऐकावयास मिळाल्या आणि निवडणूक अधिकारी आणि उमेदवार यांच्यात वादावादीचेही प्रकार घडले.
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात एकूण ७ तालुक्यांतील ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत सकाळी ७ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.७७ टक्के मतदान झाले आहे. यापैकी सकाळच्या सत्रात सकाळी ७ ते ९ पर्यंत ७.२२ टक्के, ११ पर्यंत १८.४४ टक्के, आणि दुपारी १ वाजेपर्यंत ३३.४ टक्के मतदान झाले. यापैकी बेळगाव तालुक्यात ६५ टक्के, खानापूर तालुक्यात ५३.४३ टक्के, हुक्केरी तालुक्यात ६१.६ टक्के, बैलहोंगल ३९.६३, कित्तूर ६२.०१, गोकाक ६०.४, मुडलगी तालुक्यात ६६.१३ टक्के मतदान झाले आहे.
मतपेट्या ‘सीपीएड’ सुरक्षा केंद्रात
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या शहरातील सीपीएड मैदानावरील मतदान केंद्रात सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आल्या.