सांगली पोलिसांच्या घरांवर ‘सीआयडी’चे छापे
By admin | Published: April 24, 2017 07:26 PM2017-04-24T19:26:35+5:302017-04-24T19:26:35+5:30
पुरावे गोळा करण्याचे काम सुरू : तीन पथकांद्वारे आरोपींचा शोध
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी संशयित सांगली पोलिसांच्या घरांवर सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) तीन पथकांनी छापे टाकले. संशयित कुटुंबासह बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती ‘सीआयडी’च्या सूत्रांनी दिली.
शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने ९ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविल्याप्रकरणी सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलिस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मैनुद्दीन मुल्ला, प्रवीण भास्कर-सावंत यांच्या विरोेधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे.
या विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे हे तपास अधिकारी आहेत तर अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार व पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम मार्गदर्शन करत आहेत. संशयित पोलिसांच्या अटकेसाठी तीन विशेष पथके नियुक्त केले आहेत. त्यांनी सोमवारी पुणे, सांगली, मिरज, कौलापूर येथील घरांवर छापे टाकले असता सर्वजण कुटुंबासह घराला कुलूप लावून पसार झाल्याचे दिसून आले.
संशयितांनी मोबाईल बंद ठेवल्याने त्यांचे लोकेशन मिळून आले नाही. मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये राहणाऱ्या मैनुद्दीन मुल्ला याच्या घराची झडती घेत पत्नीचा जबाब घेतला. रात्री उशिरा पोलिस अधीक्षक बनसोडे यांनी शिक्षक कॉलनीतील ‘त्या’ रूमची पाहणी करून पंचनामा केला.या गुन्ह्यात फिर्यादी झुंझारराव सरनोबत, जी. डी. पाटील व काही कर्मचाऱ्यांकडे ‘सीआयडी’चे पथक चौकशी करणार आहे.
बँक खात्यांची चौकशी
कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या संशयित महादेव ऊर्फ गुंडा नामदेव ढोले (वय ४४, रा. कोडोली, ता. पन्हाळा) याला पन्हाळा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी त्याच्यासह विनायक जाधव (रा. भामटे, ता. करवीर), संदीप बाबासाहेब तोरस्कर (रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) यांच्या बँक खात्यांची चौकशी केली व रेहान अन्सारी (रा. बिहार) याचा गुन्ह्यात सहभाग आहे की नाही, या संभ्रमावस्थेत पोलिस आहेत.
सरनोबत फिरकले नाही
शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी फिर्यादी झुंझारराव सरनोबत यांना रविवार व सोमवारी चौकशीसाठी पोलिस मुख्यालयात येण्यास निरोप दिला होता; परंतु ते दोन दिवस फिरकलेच नाहीत.
प्राप्तिकर खात्याने केली चौकशी
झुंझारराव सरनोबत यांनी १४ कोटी रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद देताच प्राप्तिकर खात्याचे अधिकाऱ्यांनी सरनोबत यांची कसून चौकशी केली. पैसा कोणाचा व तो आणला कुठून या प्रश्नांचा भडिमार केला. कोल्हापूर पोलिसांकडूनही तपासासंबंधी माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.