कबुरे कुटुंबीयांचे घर पुन्हा उभारणार, मंडळे धावली मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:24 AM2019-08-30T10:24:35+5:302019-08-30T10:26:08+5:30
पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.
कोल्हापूर : पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.
कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगेच्या परिसरात कबुरे यांचा दगडी वाडा दिमाखात उभा होता. तीन मजली इमारत या कुटुंबीयांची शान होती. तब्बल आठ खोल्या असलेला हा वाडा ८ दिवस पुराच्या पाण्यात राहिल्याने जमीनदोस्त झाला. शुक्रवार पेठेतील हे कुटुंब बेघर झाले. यात सरकारी पंचनामे झाले. अत्यल्प अनुदानही मिळाले.
यासोबतच धनंजय महाडिक युवाशक्तीने संसार सेट, तर प्रायव्हेट हायस्कूलच्या एका गु्रपने धनादेश देत मदत दिली. तरीही हे घर उभारणे अशक्य होते; त्यासाठी पुन्हा धाऊन आली कोल्हापूरकरांची माणुसकी. यात मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वैयक्तिक निरीक्षण केले. त्यांनी कबुरे कुटुंबीयांना पहिली मदत देण्याचा निर्धार केला.
त्यानुसार पैशांची जुळवाजुळव करीत नऊ लाख रुपयांचे तीन खोल्यांचे घर बांधून देण्याचा निर्धार केला. त्यानुसार मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करीत, घर बांधणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवासराव साळोखे, उद्योजक चंद्रकांत जाधव, बाबा पार्टे, राजू भोसले, रमेश पोवार, संभाजी जगदाळे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, चंद्रकांत बराले, आदी उपस्थित होते.
कबुरे कुटुंबीय पुन्हा सावरणार
सीमा कबुरे यांचे पती जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून चिपळूण येथे कार्यरत होते. १९९६ दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत सात वर्षीय प्रिती व पाच वर्षीय स्वाती या दोन मुलींवरही आभाळ कोसळले. त्यातून सावरून सीमा यांनी मुलींना उच्चशिक्षित केले. मोठी मुलगी प्रिती हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर २०१९ आॅगस्टमध्ये तीन मजली वाडाच पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झाल्याने पुन्हा दुसरा घाला नियतीने घातला. पुन्हा आपले घर होत नाही. या चिंतेने मायलेकींनी धास्ती घेतली होती; मात्र त्यातून सावरण्यासाठी मंगळवार पेठेतील अनेक मंडळे व तालीम संस्था मदतीसाठी दत्त म्हणून पुन्हा उभ्या राहत आहेत. पुन्हा तीन खोल्यांचे घर लवकरच उभे राहणार आहे.