सर्किट बेंच, खंडपीठाबाबत सहकार्य
By admin | Published: February 3, 2015 10:54 PM2015-02-03T22:54:47+5:302015-02-03T23:53:44+5:30
मुख्यमंत्री : राज्यपालांना पत्र पाठविले; कोल्हापुरात वकिलांनी घेतली भेट
कोल्हापूर : कोल्हापुरातील सर्किट बेंच अथवा खंडपीठाबाबत मुख्य न्यायमूर्तींकडून ज्या अटी घातल्या जातील त्याची पूर्तता केली जाईल. शिवाय काही कागदपत्रे, ठराव लागल्यास त्याबाबत राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली. अटींची पूर्तता व सहकार्य करण्याबाबत शासन तयार असल्याबाबतचे पत्र राज्यपालांनादेखील पाठविल्याचे त्यांनी सांगितले.बाहुबली (ता. हातकणंगले) येथील १००८ भगवान बाहुबली महामूर्तीच्या सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक सोहळा आटोपून मुंबईला जाण्यासाठी ते कोल्हापूर विमानतळावर आले असता त्यांची कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी असोसिएशनद्वारे अॅड. शिवाजी राणे व श्रीकांत जाधव यांनी सर्किट बेंच, खंडपीठाबाबत असलेली मागणी सांगितली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोल्हापुरातील सर्किट बेंच असो अथवा खंडपीठ त्यासाठीच्या शासनाकडे असलेल्या सर्व फायलींचे काम पूर्ण झाले आहे शिवाय मुख्य न्यायमूर्तींकडून ज्या अटी घातल्या जातील त्यांची पूर्तता करण्याची शासनाची भूमिका आहे तसेच अन्य काही कागदपत्रे, ठराव लागल्यास त्याबाबत पूर्ण सहकार्य केले जाईल. सर्किट बेंचबाबत शुक्रवारी (दि. ६) मुख्य न्यायमूर्ती समवेतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा केली जाईल. दरम्यान, मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय पदरात पडत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अॅड. श्रीकांत जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘सर्किट बेंच’साठी शिवसेना प्रयत्नशील : उद्धव ठाकरे
कोल्हापुरात‘सर्किट बेंच’साठी शिवसेना शेवटपर्यंत प्रयत्नशील राहील, अशी हमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी खंडपीठ कृती समितीला दिली. सर्किट बेंच प्रश्नी मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी कृती समितीच्या शिष्टमंडळाने ठाकरे यांची भेट घेतली. कृती समितीचे निमंत्रक अॅड. विवेक घाटगे यांनी ‘सर्किट बेंच’प्रश्नी सुरू असलेल्या लढ्याची माहिती दिली. त्यावर ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून मुख्य न्यायाधीशांनी केलेल्या मागणीबाबत चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा ठराव दिला जाईल, असे सांगितले. सर्किट बेंचसाठी शिवसेना शेवटपर्यंत प्रयत्नशील राहील, अशी हमी ठाकरे यांनी दिली.
...तर ‘एआयबी’वर कारवाई...
मुंबईतील ‘एआयबी’ कार्यक्रम अश्लील असल्याचा आरोप करत त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला आहे.
त्याबाबत सरकारची भूमिका काय राहणार, असे पत्रकारांशी विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अश्लीलता आणि कायद्याचा भंग झाल्यास ‘एआयबी’ कार्यक्रमावर कारवाई केली जाईल.
महसूलमंत्री खडसे मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित का राहिले, या प्रश्नावर मुख्यमंत्री मौन होते.