सर्किट बेंचप्रश्नी असहकार आंदोलनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:03 AM2019-03-18T00:03:58+5:302019-03-18T00:04:03+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी वकिलांनी रविवारी पुकारलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालय कामकाजापासून अलिप्त राहण्याच्या आंदोलनाला कोल्हापुरात यश आले. लोकन्यायालयाला आलेल्या ...

Circuit Bench Conviction of Non-Cooperation Movement | सर्किट बेंचप्रश्नी असहकार आंदोलनाला यश

सर्किट बेंचप्रश्नी असहकार आंदोलनाला यश

Next

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी वकिलांनी रविवारी पुकारलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालय कामकाजापासून अलिप्त राहण्याच्या आंदोलनाला कोल्हापुरात यश आले. लोकन्यायालयाला आलेल्या पक्षकारांना गुलाबफूल देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचे मन वळविण्यात आले. त्याला पक्षकारांनी साथ देत जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून ते परत माघारी परतले. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा वकिलांनी केला. यावेळी वकील व पोलीस यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, उद्या मंगळवारी सहा जिल्ह्यांतील खंडपीठ कृती समितीची बैठक कोल्हापुरात होणार आहे.
सकाळी कसबा बावड्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वकील एकत्र जमले. साडेनऊ वाजल्यापासून पक्षकार व बँक अधिकारी, विम्यांचे प्रतिनिधी राष्ट्रीय लोकन्यायालयासाठी येण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जाधव, सेक्रेटरी अ‍ॅड. सुशांत गुडाळकर, अ‍ॅड. माजी अध्यक्ष विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, आदींनी पक्षकारांना हात जोडून व गुलाबफूल देऊन सर्किट बेंचसाठी तुमचा पाठिंबा महत्त्वाचा आहे, असे सांगत आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, अशी विनंती केली. या विनंतीला मान देऊन अनेकजण प्रवेशद्वाराजवळून माघारी परतले. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचा बंदोबस्त होता.
त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास सर्व वकील प्रवेशद्वाराजवळ खुर्च्या टाकून बसले. यावेळी ‘वुई वॉँट हायकोर्ट इन कोल्हापूर सर्किट बेंच’ अशा घोषणा दिल्या. राष्ट्रीय लोकन्यायालयासाठी आलेल्या शहाजी लॉ, न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वकिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत ते माघारी परतले. दरम्यान, राष्ट्रीय लोकन्यायालयासाठी पक्षकारांना येऊ द्या, अशी विनंती न्यायालयीन पातळीवरही वकिलांना करण्यात आली. आंदोलनात माजी अध्यक्ष अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. रणजित गावडे, अ‍ॅड. विजय महाजन, अ‍ॅड. सचिन पाटील, अ‍ॅड. अभिजित कापसे, अ‍ॅड. आर. एल. चव्हाण, अ‍ॅड. सतीश खोतलांडे, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील-अरळगुंडीकर, अ‍ॅड. प्रशांत पाटील, अ‍ॅड. नारायण भांदिगरे, अ‍ॅड. डी. डी. देसाई, अ‍ॅड. प्रमोदिनी शिंदे, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, अ‍ॅड. मीना पोवार, अ‍ॅड. दीपक पिंपळे, अ‍ॅड. नामदेव हतकर, अ‍ॅड. कुलदीप कोरगावकर, आदी उपस्थित होते.

वकील-पोलीस शाब्दिक चकमक
रविवारी सकाळी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकजण जात होता.
त्याला पोलिसांनीच आत सोडले, असा
समज झाल्याने
वकील व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या प्रकारामुळे येथील वातावरण तापले.

Web Title: Circuit Bench Conviction of Non-Cooperation Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.