‘सर्किट बेंच’ लटकले, मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:42 AM2019-09-25T10:42:17+5:302019-09-25T10:43:46+5:30
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांच्या फक्त आश्वासनावरच लटकले आहे. पुणे बार असोसिएशनची मागणीही कळीचा मुद्दा ठरत आहे. ठोस असा निर्णय अद्याप कोणत्याही स्तरावर झालेला नाही. खंडपीठ कृती समितीकडून सर्व प्रकारची आंदोलने झाली. आता हीच समिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने या प्रश्नावर सन जानेवारी २०२० मध्येच घडामोडी घडतील, असे चित्र आहे.
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांच्या फक्त आश्वासनावरच लटकले आहे. पुणे बार असोसिएशनची मागणीही कळीचा मुद्दा ठरत आहे. ठोस असा निर्णय अद्याप कोणत्याही स्तरावर झालेला नाही. खंडपीठ कृती समितीकडून सर्व प्रकारची आंदोलने झाली. आता हीच समिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने या प्रश्नावर सन जानेवारी २०२० मध्येच घडामोडी घडतील, असे चित्र आहे.
कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा प्रश्न गेली काही वर्षे ऐरणीवर आला असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांंतील वकिलांनी या प्रश्नासंबंधी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घ्यावयाचा असून, त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या प्रश्नासंबंधी खंडपीठ कृती समितीने २८ आॅगस्टला मुख्य न्यायाधीश नंद्रजोग यांची भेट घेतली. यावेळी कृती समिती निमंत्रक अॅड. रणजित गावडे यांनी तत्कालीन मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंच संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव सादर केला आहे. न्यायाधीश नंद्रजोग यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेसंदर्भात मी सकारात्मक असून, लवकरच निर्णय घेतला जाईल, असा विश्वास कृती समितीला दिला होता, असे कृती समिती सांगते.
न्यायाधीश नंद्रजोग हे कोल्हापुरातील वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला आले नाहीत. त्यांनी बैठक घेऊ, असे कृती समितीला सांगितले होते; परंतु या बैठकीचे निमंत्रण त्यांच्याकडून अद्यापही आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील ठोस निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. ते काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर त्यांनी कृती समितीला उच्च न्यायाधीशांसोबत बैठकीचा निरोप देतो, असे आश्वासन दिले होते; परंतु त्यांच्याकडूनही कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर सर्किट बेंचचा प्रश्न सध्यातरी लटकल्याचे चित्र आहे.
सर्किट बेंच प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री यांच्या निर्णयावर आहे. दोघांनी बैठकीसाठी निमंत्रण देतो, असे सांगितले आहे; परंतु त्यांच्याकडून अद्यापही बोलावणे आलेले नाही. आम्ही सतत पाठपुरावा करीत असून, लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.
अॅड. रणजित गावडे,
कृती समितीचे निमंत्रक