‘सर्किट बेंच’प्रश्नी आंदोलन तीव्र करणार

By admin | Published: September 11, 2015 12:57 AM2015-09-11T00:57:11+5:302015-09-11T00:57:11+5:30

महारॅलीने सर्वपक्षीय निषेध : वुई वाँट हायकोर्ट, सर्किट बेंच झालेच पाहिजेच्या उत्स्फूर्त घोषणा

'Circuit Bench' questions will aggravate the agitation | ‘सर्किट बेंच’प्रश्नी आंदोलन तीव्र करणार

‘सर्किट बेंच’प्रश्नी आंदोलन तीव्र करणार

Next

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शहरातून दुचाकींची भव्य महारॅली काढून आपला संताप व्यक्त केला.
‘वुई वाँट हायकोर्ट’ आणि ‘सर्किट बेंच झालेच पाहिजे’ अशा घोषणा महारॅलीतून दिल्या. या आंदोलनात वकिलांसह सर्व पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या महारॅलीस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. सर्किट बेंच प्रश्नी संघर्षाला आता नव्याने प्रारंभ झाला. सर्किट बेंच मिळाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार यावेळी सर्व वकिलांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केला.
या आंदोलनात महापौर वैशाली डकरे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन परिवर्तन पार्टी, आदी पक्षांचे प्रतिनिधी तसेच शहाजी लॉ कॉलेज आणि न्यू लॉ कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होेते.
सकाळी दहा वाजता जिल्हा न्यायालयासमोर माजी महापौर आर. के. पोवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महारॅलीला प्रारंभ झाला. ही दुचाकी रॅली स्टेशन रोडमार्गे ताराराणी पुतळा, तसेच टेंबलाई उड्डाणपुलावरून, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी, माउली पुतळा, राजारामपुरी मुख्य मार्गावरून पुन्हा उमा चित्रमंदिर, आझाद चौक, खासबाग, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, महापालिका मार्गे शिवाजी चौक या मार्गावरून निघाली. रॅलीमध्ये न्या. मोहित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या मार्गावरील राजाराम महाराज पुतळा, छत्रपती शाहू महाराज पुतळा, ताराराणी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
रॅलीची सांगता जिल्हा सत्र न्यायालयासमोर झाली. यावेळी झालेल्या सभेत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. रॅलीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर, महिला कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्या घोटणे, दिलीप पवार, जयकुमार शिंदे, राजू जाधव, शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव यांशिवाय बार असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, सचिव रवींद्र जानकर, अ‍ॅड. सुनील रणदिवे, धनश्री चव्हाण, विजय तारे-देशमुख, सुशीला कदम, मिलिंद जोशी, सुश्मिता कामत, माणिक शिंदे, विवेक जाधव, शिवाजीराव राणे, महादेवराव आडगुळे, संतोष शहा, विवेक घाटगे, राजेंद्र मंडलिक, राजेंद्र पाटील, बाळासो पाटील, डी. एन. जाधव, अजय कुलकर्णी, प्रशांत शिंदे, इलाई जंगले, संपतराव पवार, मीना पोवार, प्रबोधिनी शिंदे, चारूलता चव्हाण, सरिता भोसले, पूजा भुरके, सुचिता घोरपडे, कल्पना माने, सुलभा चिपडे, आदी सहभागी झाले होते.
आमदारांचे पायी आंदोलन
शिवसेनेच्यावतीने आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रस, शिवाजीराव जाधव, आदी शिवसैनिकांनी दाभोळकर चौक ते ताराराणी चौकापर्यंत पायीच रॅली काढून लक्ष वेधले. यावेळी त्यांनी सर्किट बेंचप्रश्नी घोषणा दिल्या. शिवसैनिकांच्या हातांत भगवे झेंडे होते. ही पायी रॅली ताराराणी चौकात दुचाकीवरून महारॅलीमध्ये सहभागी झाली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Circuit Bench' questions will aggravate the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.