सर्किट बेंचप्रश्नी पुन्हा एल्गार
By admin | Published: July 30, 2016 12:17 AM2016-07-30T00:17:54+5:302016-07-30T00:33:12+5:30
१६ आॅगस्टपासून उपोषण : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सभेत निर्णय
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सहा जिल्ह्यांचे प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा वकील बांधवांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत १६ आॅगस्टपासून लाक्षणिक उपोषणाद्वारे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. प्रसंगी जेलमध्ये जाण्याचीही तयारी वकिलांनी यावेळी दर्शविली. दरम्यान, याप्रश्नी आज, शनिवारी सहा जिल्ह्यांतील वकिलांसमवेत कोल्हापुरात न्यायसंकुलामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता बैठक होणार आहे.
शुक्रवारी येथील न्यायसंकुलाच्या इमारतीमध्ये जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा बारचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. यावेळी प्रास्ताविकात अॅड. मोरे यांनी आज होणाऱ्या बैठकीसाठी ६३ बारना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीत वादावादी होऊ नये, यासाठी वकील बांधवांच्या सूचना व चर्चा करण्यासाठी आजची ही सभा बोलाविण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायसंकुलामधील पार्किंग प्रश्न यासाठी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यानंतर अॅड. शिवराम जोशी यांनी सर्किट बेंचप्रश्नी आम्ही ठामपणे उभे राहू; पण कोल्हापूरच्या हद्दवाढप्रश्नी वकील बांधवांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. परस्पर निर्णय घेऊ नये, अशी भूमिका आहे, असे सांगितले. अॅड. विवेक घाटगे म्हणाले, पार्किंगवरून वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यावर ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षणी आंदोलन केले तर आम्ही तयार आहे. अॅड. शिवाजी राणे यांनी सहा जिल्ह्यांतील वकिलांशी चर्चा करा. हद्दवाढीच्या प्रश्नात वकील बांधवांनी न पडलेले बरे, अशी आपली प्रामाणिक भूमिका असल्याचे सांगितले.
अॅड. अजित मोहिते यांनी, यापूर्वी सर्किट बेंचप्रश्नी आंदोलन झाले आहे. आमचीही जेलमध्ये जाण्याची तयारी आहे. हे आंदोलन विशिष्ट टप्प्यावर आले आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी, कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी सकारात्मक निर्णय घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी न्यायालयीन व राष्ट्रीय लोक अदालतीच्या कामकाजापासून अलिप्त राहू. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊया, असे मोहिते यांनी सांगितले.
त्यानंतर अॅड. प्रकाश मोरे यांनी, सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनात विविध स्वयंसेवी संघटना, संस्था यांनाही सहभागी करून घ्यावे, जेणेकरून आंदोलन यशस्वी होईल, असे सांगून १६ आॅगस्टपासून लाक्षणिक उपोषणाचा निर्णय जाहीर केला. यावेळी अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. राजेंद्र किंकर, अॅड. व्ही. आर. पाटील, अॅड. बाळासो पाटील, अॅड. रणजित गावडे, आदींनी मते व्यक्त केली.
सभेस सचिव अॅड. सर्जेराव खोत, अॅड. अंशुमन कोरे, अॅड. प्रशांत पाटील, अॅड. मेघा पाटील, अॅड. गुरू हारगे, अॅड. मिथुन भोसले, अॅड. शहाजी पाटील, अॅड. धैर्यशील पवार, अॅड. अनुजा देशमुख, अॅड. संदीप चौगले, अॅड. यतीन कापडिया, आदी उपस्थित होेते.
सर्किट बेंचप्रश्नी आता थांबून चालणार नाही. पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले पाहिजे. त्यासाठी विविध स्वयंसेवी संघटना, संस्था यांनाही सहभागी केले पाहिजे.
- अॅड. प्रकाश मोरे, अध्यक्ष,
जिल्हा बार असोसिएशन