जनतेच्या ताकदीवर सर्कीट बेंच मिळवू : ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:51 PM2020-02-04T16:51:16+5:302020-02-04T16:54:24+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरला सर्कीट बेंच व्हावे यासाठी ३२ वर्षापासून आंदोलन सुरु आहे. कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा हा प्रश्न बनला आहे. आता ...
कोल्हापूर : कोल्हापूरला सर्कीट बेंच व्हावे यासाठी ३२ वर्षापासून आंदोलन सुरु आहे. कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा हा प्रश्न बनला आहे. आता यश जवळ आले असून जनतेच्या ताकदीवर सर्कीट बेंच मिळवू, असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात सर्कीट बेंचसाठी मंगळवारी जिल्ह्यातील वकीलांनी कामकाजापासून अलिप्त राहत कसबा बावडा येथील न्याय संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.
एन.डी. पाटील म्हणाले, वकीलांचा ३२ वर्षाचा संघर्ष आणि महाराष्ट्रातील बदलेले वातावरण यामुळे संर्कीट बेंचचा निर्णय लवकरच होईल, असे चित्र आहे. हा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी जनतेच्या ताकदीवर नव्याने जोमाने लढा उभारला जाईल. अखेरचा श्वास असे पर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. सर्कीट बेंचसाठी अनुकूल वातावरण आहे. यश आपलेच आहे ते केवळ खेचून आणायचे बाकी आहे.
यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रणजित गावडे, ज्येष्ठ वकील डी.बी. भोसले, प्रसाद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. शिवाजीराव राणे, अजित मोहिते, खंडपीठ कृती समितीचे आर.के. पोवार, बाबा पार्टे, गणी आजरेकर, अशोक पोवार, रमेश मोरे, दिलीप पवार, भगवान काटे आदी उपस्थित होते.