‘सर्किट बेंच कोल्हापुरात झालेच पाहिजे’

By admin | Published: February 2, 2017 12:58 AM2017-02-02T00:58:12+5:302017-02-02T00:58:12+5:30

मोटारसायकल रॅलीद्वारे एल्गार : सर्वपक्षीय संघटनांचे आंदोलन; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

'Circuit Benchmark Must Be In Kolhapur' | ‘सर्किट बेंच कोल्हापुरात झालेच पाहिजे’

‘सर्किट बेंच कोल्हापुरात झालेच पाहिजे’

Next

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच झालेच पाहिजे, या मागणीसाठी वकिलांसह राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, आदींकडून गेल्या ६२ दिवसांहून अधिक काळ साखळी उपोषणाद्वारे आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सकाळी सर्वपक्षीय संघटना, तालीम मंडळ, महाविद्यालयीन विद्यार्थी व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती यांच्यावतीने शहराच्या प्रमुख मार्गांवरून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कसबा बावडा येथील न्यायसंकुलात महापौर हसिना फरास यांच्या उपस्थितीत झाली, तर सांगता जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देऊन झाली. यावेळी हजारो वकिलांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी व राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे, सामजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे, अभिनेते विजय पाटकर, आदींनी सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीला पाठिंबा दर्शविणारे भाषण केले. रॅली पितळी गणपतीमार्गे कावळा नाका, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज चौक, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, दैवज्ञ बोर्डिंग, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, सीपीआर चौक जुना न्यायालय परिसर, दसरा चौक, शहाजी कॉलेज, खानविलकर पंप आणि अखेर जिल्हाधिकारी कार्यालय येथे विसर्जित करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात रॅली आल्यानंतर नियमित प्रवेशद्वार सोडून आंदोलकांनी जाण्याच्या मार्गाने प्रवेश केला. त्यामुळे काही काळ थेट कार्यालयाच्या दारात आंदोलक आल्याने बंदोबस्तावरील पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी ‘खंडपीठ कोल्हापुरात झालेच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. घोषणा देणाऱ्यांमध्ये महापौर हसिना फरास, सिटिझन फोरमचे प्रसाद जाधव, माजी अध्यक्ष विवेक घाटगे होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्याबाबत मागील ३० वर्षांपासून प्रदीर्घ आंदोलन सुरू आहे. सहा जिल्ह्यांतील सर्व वकील संघटनांसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी १ डिसेंबरपासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी निवृत्तीपूर्वी राज्य शासन अनुषंगिक बाबींची पूर्तता करीत असेल तर कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करता येईल, असा अहवाल दिला होता. तरीही अद्याप सरकार व न्याय संस्थेने त्याची स्थापना केलेली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
या रॅलीत माजी महापौर आर. के. पोवार, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, नगरसेवक सत्यजित कदम, आशिष ढवळे, नगरसेविका उमा इंगळे, सविता भालकर, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. सर्जेराव खोत, अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अ‍ॅड. संपत पवार, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, आर. बी. पाटील, मेघा पाटील, प्रशांत पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, भाकपचे चंद्रकांत यादव, बाबा पार्टे, अशोक भंडारे, अनिल कदम, अ‍ॅड. सुरेश कुराडे, पद्माकर कापसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, महेश जाधव, अशोक देसाई, लॉरी असोसिएशनचे सुभाष जाधव, हेमंत डेसले, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, ‘कॉमन मॅन’चे अ‍ॅड. बाबा इंदुलकर, प्रसाद जाधव, संभाजी जगदाळे, मनसे वाहतूक सेनेचे राजू जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, किशोर घाटगे, रमेश खाडे, शिवसेना महिला आघाडीच्या रूपाली कवाळे, मेघा पेडणेकर, विश्व हिंदू परिषदेचे अनुप भिवटे, अशोक रामचंदाणी, सुरेश जरग, लालासाो गायकवाड, आदी उपस्थित होते.


साखळी उपोषणास वाढता पाठिंबा
बुधवारी साखळी उपोषणात कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आर. के. जाधव, उपाध्यक्ष डॉ. मा. वि. कुलकर्णी, कार्यवाह माधव कुलकर्णी, खजानिस बाजीराव निकम, शंकर गिरीगोसावी, राम पाटील, लक्ष्मण देसाई, नामदेवराव जाधव, कमल चलगुंडी, नामदेवराव शिरढोणे, डी. बी. चौगुले, डी. बी. देसाई, सुधीर मालपेकर, हिंदुराव पाटील, आप्पासाहेब जिरगे, मोहन फडके व शहाजी लॉ कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, महावीर महाविद्यालयाचे विद्यार्थी, आदींनी सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध
आठ दिवसांपूर्वी जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाचा एक भाग म्हणून सर्व वकिलांसह सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीच्यावतीने आपणाला निवेदन देण्यासाठी येत आहोत, तरी आपण उपस्थित राहावे अशी विनंती केली होती.
मात्र, बुधवारी ते निवेदन स्वीकारण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत. या कारणावरून कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी त्यांचा निषेध केला. ही बाब त्यांना कळावी असेही अ‍ॅड. मोरे यांनी निवेदन देताना निवासी उपजिल्हाधिकारी यांना सांगितले.
नव्या-जुन्यांचा वाद
प्रत्येक आंदोलनात स्वयंघोषित मी नेता म्हणून माझेच भाषण ऐकावे, असा प्रत्येक वेळा हट्ट धरणाऱ्या नेत्याबद्दल बुधवारी मोठा रोष दिसून आला. निवेदन देऊन बाहेर आलेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये सिटिझन फोरमचे प्रसाद जाधव यांनी जुने, ज्येष्ठ कार्यकर्ते मला म्हणणे मांडू देत नाहीत, असे इतरांना सांगत होते. त्या दरम्यान तेथून निवासराव साळोखे, आदी मंडळी जात होती. हे बोलणे ऐकल्यानंतर काही काळ साळोखे व जाधव यांच्यात शाब्दिक खटके उडाले. त्यातून जुन्या- नव्यांचा वाद दिसून आला.


लक्षवेधक ठरला पेहराव
शहाजी लॉ कॉलेजचा विद्यार्थी श्रीकांत काळाई यांनी कोल्हापूरला खंडपीठ व्हावे, या मागणीसंदर्भात पेहराव केला होता. त्यात खंडपीठासंदर्भातील विविध कारणे स्पष्ट केली होती. सर्वोच्च न्यायालयाने नवीन खंडपीठ स्थापन व्हावे, यासाठी निदर्शने केल्याचा उल्लेख असलेले पत्रकही शर्टवर लावले होते. त्याचा हा पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
मागण्यांचे फलक असे
‘वुई वॉन्ट मुंबई हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर’, ‘कोल्हापूरच्या खंडपीठास विलंब का ?’, ‘जस्टिस डिले इज जस्टिस डिनायड’, ‘आमची मागणी मान्य करा, अन्यथा खुर्च्या खाली करा’, ‘कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे परिक्रमा न्यायालय झालेच पाहिजे’, ‘खंडपीठ आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘सर्वपक्षीय सर्वसामान्यांची एकच मागणी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झालेच पाहिजे’, आदी घोषणा फलक रॅलीत आंदोलकांच्या हाती होते.

Web Title: 'Circuit Benchmark Must Be In Kolhapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.