सर्किट बेंचआंदोलन ताकदीने सुरूच ठेवणार
By admin | Published: April 13, 2017 01:00 AM2017-04-13T01:00:55+5:302017-04-13T01:00:55+5:30
खंडपीठ पक्षकार कृती समिती मेळाव्यात निर्णय : उद्यापासून सहा जिल्ह्यांचा जनजागृती दौरा
कोल्हापूर : खंडपीठ हे सहा जिल्ह्यांसाठी असल्याने नेतृत्ववादाचा मुद्दा न ठेवता कोल्हापुरात खंडपीठ होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्णय खंडपीठ पक्षकार कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला. उद्या, शुक्रवारी बिंदू चौकात संविधानाचे पूजन करून सहा जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याचे सिटिझम फोरमचे प्रसाद जाधव यांनी सांगितले. येथील शाहू स्मारक भवनमध्ये बुधवारी सकाळी हा मेळावा पार पडला.
कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी २८ वर्षांपासून वकिलांनी लढा उभारला आहे. हा लढा आता अंतिम टप्प्यात आहे. गेल्या पाच वर्षांपासून आंदोलनाची तीव्रता वाढल्यामुळे राज्य सरकारने कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे यासाठी ठराव उच्च न्यायालयात पाठविला आहे तसेच ५ एप्रिलला कोल्हापुरातील सर्व खासदार, आमदार, महापौर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खंडपीठासाठी प्रयत्न करण्याचे निवेदन दिले होते. त्यामुळे खंडपीठाचा मुद्दा आता निर्णयाच्या अंतिम टप्प्यात आला आहे.
प्रसाद जाधव म्हणाले, श्रेयवादामुळे आंदोलन दिशाहीन होत आहे. खंडपीठ मिळणे अंतिम टप्प्यात असताना कोणा एकामुळे हे यश मिळालेले नाही तर त्यासाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील जनता व वकिलांनी रेटा लावला आहे. २०१३ पासून आम्ही सायकल रॅली, मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आंदोलन केले आहे.
बाजीराव नाईक, अॅड. पंडितराव सडोलीकर, शिवाजीराव परूळेकर, अॅड. बाळासाहेब पाटील, अॅड. व्ही. आर. पाटील, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, ‘मनसे’चे राजू जाधव, अॅड. पद्माकर कापसे, गायत्री राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, बाबा महाडिक, सुनील सामंत, गणेश चिले, किशोर डवंग, अशोक रामचंदानी, मधुकर पाटील, बजरंग शेलार, प्रकाश पाटील, महादेव पाटील, फिरोज शेख, सुभाष कोळी, संभाजी जगदाळे, प्रशांत पाटील, शक्ती सारंग, वंदना आळतेकर, सविता पाटील, शोभा खेडकर, आदी उपस्थित होते.
श्रेयवाद, नेतृत्ववादामुळे आंदोलन दिशाहीन
खंडपीठासाठी श्रेयवाद व नेतृत्ववाद यामुळे वेगळाच मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे आंदोलन दिशाहीन होत आहे. याबाबत उठणारे गैरसमज दूर करण्यासाठी खंडपीठ नागरी पक्षकार कृती समितीच्यावतीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णंय घेतला. या आंदोलनात वकील सहभागी झाले नाहीत, तरी खंडपीठ हे सर्वसामान्य पक्षकारांसाठी गरजेचे आहे. यासाठी न्यायव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करायचा, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.
कोल्हापूर खंडपीठ स्थापन करावे, या मागणीसाठी बुधवारी कोल्हापुरात शाहू स्मारक भवनमध्ये खंडपीठ पक्षकार कृती समितीच्यावतीने आयोजित मेळाव्यात निमंत्रक प्रसाद जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. पद्माकर कापसे, अॅड. पंडितराव सडोलीकर, सचिन तोडकर, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.