राजारामपुरीतील मंडळांना वेध देखाव्यांचे
By Admin | Published: August 31, 2014 12:15 AM2014-08-31T00:15:34+5:302014-08-31T00:30:30+5:30
मिरवणुकीद्वारे ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना : कार्यकर्त्यांची धावपळ सुरू
कोल्हापूर : शहरात सर्वत्र अनंत चतुर्दशीदिवशी गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक काढली जाते. मात्र, राजारामपुरीत ‘श्रीं’चे स्वागत भव्य मिरवणुकीद्वारे केले जाते. यावर्षीही राजारामपुरीतील अनेक मंडळांनी भव्य मिरवणुकीद्वारे ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. आता मंडळांतील कार्यकर्त्यांना वेध लागले ते देखावा सुरू करण्याचे.
राजारामपुरीत मोजकीच मंडळे जरी देखावे करत असली तरी काही मंडळे देखावे न करता आकर्षक व मोठ्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. येथील गणेश दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळेच नोकरी-व्यवसायाचा व्याप सांभाळून मंडळाच्या कार्यकर्त्यांची देखावे सुरू करण्यासाठी धावपळ सुरू आहे. काही मंडळांत मुख्यत: देखावे करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते स्वत: कारागिरांना मदत करत आहेत, असे चित्र राजारामपुरीत दिसत आहे.
राजारामपुरी येथील बहुसंख्य मंडळांच्या देखाव्याचे काम रात्रीच्या वेळीच सुरू असते. दिवसा वाहतुकीमुळे अडसर होत असल्याने हे काम रात्री करण्याला कार्यकर्ते पसंती देत आहेत.
येथील काही मंडळे पहिल्या दिवशीच देखावे खुले करतात, तर बहुतांश मंडळे घरगुती गणेशमूर्ती विसर्जनानंतर देखावे खुले करतात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पारंपरिकता जपत आधुनिकतेकडे झेपावणारे देखावे करत असल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.