नागरी बँकांमधील नोकरभरती आता आॅनलाईन- भरतीतील गैरव्यवहारास चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 08:13 PM2019-01-22T20:13:16+5:302019-01-22T20:13:42+5:30
राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरतीमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी ही भरती यापुढे आॅनलाईन पद्धतीनेच करणे बंधनकारक असल्याचा आदेश सहकार विभागाने सोमवारी काढला. बँकिंग क्षेत्रातील बदलती
विश्वास पाटील ।
कोल्हापूर : राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरतीमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी ही भरती यापुढे आॅनलाईन पद्धतीनेच करणे बंधनकारक असल्याचा आदेश सहकार विभागाने सोमवारी काढला. बँकिंग क्षेत्रातील बदलती स्थिती, तांत्रिकदृष्ट्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता व स्पर्धात्मक बँकिंगसाठी गुणवत्तापूर्ण कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा, हा या निर्णयामागे हेतू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. नागरी बँकांतून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या एकूण अर्थकारणांमध्ये आणि विकासामध्येही राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत नागरी सहकारी बँकांचा वाटा नेहमीच मोठा राहिला आहे. आजही या बँकांच सर्वसामान्य कर्जदार व ठेवीदार यांनाही जवळच्या वाटतात. १00 वर्षांचा उज्ज्वल इतिहास व पारदर्शक कारभार असणाऱ्या कित्येक बँका आहेत. या बँकांमधील नोकरभरती सध्या त्या त्या बँकेच्या नियमानुसार होते. तिला एकत्रित अशी काही सिस्टम किंवा नियमावली नाही. निश्चित स्टाफिं ग पॅटर्नही पाळला जात नाही. अनेकदा गुणवत्तेपेक्षा संचालकांशी लागेबांधे असणारे लोकच कर्मचारी म्हणून निवडले जातात व ही निवड होतानाही आर्थिक व्यवहार होतात; त्यामुळे असा वशिल्यातून नियुक्त झालेला स्टाफ असेल, तर तो तज्ज्ञ, प्रशिक्षित व गुणवत्तेचा नसतो.
त्याअनुषंगाने काही तक्रारी सरकारकडेही झाल्या आहेत. म्हणून नोकरभरती पारदर्शक व्हावी, यासाठी ती आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.
ही भरती करताना बँकेला स्वत: अडचणी येऊ शकतात, त्यासाठी इंडियन बँकिंग पर्सनल मॅनेजमेंट सिलेक्शन बोर्ड, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ बँकिंग अॅन्ड फायनान्स मुंबई, धनंजराव गाडगीळ प्रबंध संस्था नागपूर किंवा बँकिंग भरती परीक्षा घेणाºया तत्सम संस्थांसाठी या प्रक्रिया राबविण्यात याव्यात. मुलाखतीसाठी आॅनलाईन परीक्षा व मौखिक परीक्षेसाठी गुणांचे प्रमाण ९० : १० असे ठेवण्यात यावे, असेही या आदेशात म्हटले आहे.
दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँका
एकूण बँका : ५०८
सभासद : ७६ लाख २२ हजार
ठेवी : ६९ लाख ४४ हजार ४३९ लाख
कर्जे : ४० लाख ७७ हजार ९०० लाख
(स्त्रोत : सहकार आयुक्त कार्यालय)
सरकारचा निर्णय चांगला आहे; त्यामुळे नागरी बँकांमध्ये मेरिटनुसार सेवकभरती होईल. त्यातून या बँकांमध्ये व्यावसायिकता वाढीस लागेल व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सग्यासोयºयांची भरतीस त्यास चाप बसून विश्वास वाढीस लागेल. - विद्याधर अनासकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नागरी बँक्स असो.
सहकार विभागाने घेतलेला निर्णय चांगला आहे. मी स्वत:ही याच पद्धतीने नोकरभरती व्हायला हवी, यासाठी आग्रही आहे. आॅनलाईन भरतीमुळे चांगला स्टाफ नियुक्त केला जाईल व त्याचा बँकेच्या कारभारात उपयोग होईल. - अनिल निगडे, अध्यक्ष, शतकमहोत्सवी कोल्हापूर अर्बन को-आॅप. बँक, कोल्हापूर