नागरी बँका ‘आण्णासाहेब पाटील महामंडळा’तर्फे कर्ज देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:16 AM2021-07-08T04:16:23+5:302021-07-08T04:16:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका या सामान्य ग्राहकांशी जोडल्या असून, या बँकांच्या माध्यमातून मराठा समाजातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका या सामान्य ग्राहकांशी जोडल्या असून, या बँकांच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील कर्ज योजना व बहुजन समाजातील तरुणांसाठी व्यवसाय कर्ज योजना सक्षमपणे राबवणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष व राजे विक्रमसिंह घाटगे कागल बँकेचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागरी बँकांकडून आण्णासाहेब पाटील महामंडळाकडील कर्ज योजना व इतर समाजातील तरुणांसाठी व्यवसाय कर्ज देण्याबाबत बुधवारी समरजित घाटगे यांनी जिल्ह्यातील नागरी बँकांच्या प्रतिनिधींची बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
समरजित घाटगे म्हणाले, राजर्षि शाहू महाराजांच्या जन्मभूमीत आपण काम करत असताना त्यांच्या विचाराने पुढे गेले पाहिजे. सध्या सर्वच समाजातील तरुणांमध्ये बेरोजगारी प्रमाण आहे. यासाठी नागरी बँकांच्या माध्यमातून व्यवसाय कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेतला.
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात २१६ कोटी तर, राज्यात १७५३ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये राजे बँकेने ३५ कोटीचे कर्ज दिले; मात्र एक रुपयाही थकीत राहिलेला नाही. नागरी बँकांनी योग्य ते तारण घेऊन कर्ज दिल्यास तरुण चांगल्या प्रकारे परतफेड करतात. हा विश्वास बँकांना दिल्याने त्यांनी कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे.
अशोक चराटी, चेतन नरके, शिरीष कणेरकर, अनिल सोलापुरे, सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, विठ्ठल मोरे, अरुण आलासे, आण्णासाहेब भोजे, विजय भोसले, दत्तात्रय राऊत, रवींद्र गोंदकर, राजेश पाटील, सोमनाथ मोती, अशोक पाटील, सदाशिव जोशी आदी उपस्थित होते.
राजे बँक समन्वय करणार
जिल्ह्यातील बँकांचा एक समन्वय संचालक म्हणून या कर्ज योजनेसाठी काम करणार आहे. राजे बँक समन्वयकाची भूमिका घेणार असून, लक्ष्मीपुरी शाखेत कर्जदारांच्या काही अडचणी असेल तर त्याची सोडवणूक केली जाईल, असे घाटगे यांनी सांगितले.
राज्यातील नागरी बँकांची बांधणी करणार
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यातील नागरी बँकांशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून बहुजन समाजातील तरुणांना आण्णासाहेब पाटील महामंडळ व इतर व्यवसाय कर्ज देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे समरजित घाटगे यांनी सांगितले.