प्रशासनासह नागरिकही गोंधळात; बाजारपेठीतील गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:31+5:302021-05-06T04:25:31+5:30
काेल्हापूर : सचारबंदी, लॉकडाऊन की जनता कर्फ्यू, अशा मानसिक गोंधळात जिल्हा प्रशासन अडकले असताना शहरातील नागरिक मात्र रस्त्यावर येऊन ...
काेल्हापूर : सचारबंदी, लॉकडाऊन की जनता कर्फ्यू, अशा मानसिक गोंधळात जिल्हा प्रशासन अडकले असताना शहरातील नागरिक मात्र रस्त्यावर येऊन गर्दी करत आहेत. बुधवारी दुकानांतील व्यवहार सुरू, बाजारपेठेत गर्दी, रस्त्यावर वाहनांची गर्दी, भाजी मंडईत महिलांची गर्दी होत असताना महापालिका, पोलिसांनी त्यांना अटकाव केला नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, ती शनिवारपासून कडक करण्यात आली आहे; परंतु तरीही नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी सकाळच्या सत्रात रस्त्यावर संचार करताना पाहायला मिळत आहेत. भाजीमंडईत नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे गर्दी न करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनास नागरिकांनी केराची टोपली दाखविली आहे.
राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी लॉकडाऊन जाहीर केले. लागलीच या लॉकडाऊनवर समाजमाध्यमांतून प्रचंड टीका होताच सायंकाळी लॉकडाऊनऐवजी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. जिल्हा प्रशासन जसे गोंधळले आहे, तसेच शहरवासीयसुद्धा गोंधळून गेले आहेत. मंगळवारी आठ दिवस लॉकडाऊनचा निर्णय समाजमाध्यमांवर फिरताच नागरिकांनी बुधवार उजाडताच बाजारपेठेत गर्दी केली. आठवडाभर लागणाऱ्या भाज्या, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ही गर्दी होती. गेल्या पंधरा दिवसांतील ही सर्वाधिक गर्दी होती.
शहराच्या सर्वच रस्त्यांवर नागरिकांचा संचार होता. वाहनांची काही ठिकाणी कोंडी झाल्याचे चित्रही पाहायला मिळाले. सकाळी ११ वाजता व्यवहार बंद ठेवायचे असताना अनेक ठिकाणी दुपारी १ वाजेपर्यंत ते सुरूच होते. दुपारपर्यंत शहरात असेच वातावरण होते. दुपारनंतर वळवाचा पाऊस दाटून आल्यानंतर मात्र रस्त्यावरील गर्दी ओसरली व शुकशुकाट पसरला.