कोनोली तर्फ असंडोलीपैकीतील नागरिक भीतीच्या छायेखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:08+5:302021-07-27T04:25:08+5:30
कुपलेवाडी ही सुमारे ५०० च्या आसपास लोकवस्ती असलेली वस्ती मुख्य गावापासून व रस्त्यापासून सुमारे दोन अडीच किलोमीटर आत ...
कुपलेवाडी ही सुमारे ५०० च्या आसपास लोकवस्ती असलेली वस्ती मुख्य गावापासून व रस्त्यापासून सुमारे दोन अडीच किलोमीटर आत डोंगराच्या कुशीत वसलेली शेतात राबणाऱ्यांची नागरी वस्ती आहे. दोन दिवसांपूर्वी या परिसरात ढगफुटीसदृश पाऊस होऊन रात्रीच्या वेळेस गाढ झोपेत असणाऱ्या कुटुंबावर भूस्खलनाच्या रूपाने घाला घालून दोन घरासह त्या घरातील दोन करती माणसे आणि गोठ्यातील चार जनावरांचा जागीच मृत्यू झाला. याचबरोबर या शेजारी असणाऱ्या दोन घरांचे अंशत नुकसान झाले
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही सजग नागरिकांनी या डोंगराची पाहणी केली असता या डोंगरास लहान मोठ्या अनेक भेगा पडलेल्या असून भविष्यात येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन या संपूर्ण नागरी वस्तीसह जीवितास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच वाडीच्या शेजारी असणाऱ्या भैरीचा दरा नावाच्या डोंगरांमध्ये त्याच रात्री मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन शेकडो झाडेझुडपे व मोठ्या प्रमाणावर मातीचा मलबा येऊन परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
येथील डोंगराला लहान मोठ्या भेगा पडल्या असल्याने प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापर्यंत सर्वांच्या पोशिंद्याच्या भूमिकेत असणारा डोंगर काळ बनू पाहत आहे. अन्य पर्याय नसल्याने येथेच रहावे लागत आहे. शासनाने या डोंगराची पाहणी करून कायमस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा.
भैरू कुपले, कुपलेवाडी नागरिक.