वाहतुकीच्या कोंडीने नागरिक बेजार
By Admin | Published: March 27, 2015 12:21 AM2015-03-27T00:21:11+5:302015-03-27T00:21:33+5:30
मंगळवार पेठ : विभागीय क्रीडासंकुलात स्थानिक खेळाडंूना सरावाची संधी द्या; उद्यान उरले नावापुरते
गणेश शिंदे/ प्रवीण देसाई
ल्ल कोल्हापूर
मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक या मार्गावरील अवजड वाहनांच्या रहदारीने होणाऱ्या वाहतुकीची कोंडी या समस्येने येथील नागरिक बेजार झाले आहेत. छोटे-मोठे अपघात ही नित्याचीच बाब बनली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता, अस्वच्छ गटारींमुळे डासांचे साम्राज्य, त्यातून निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न, त्यासाठी वरचेवर औषधांची फवारणी होण्याची गरज, परिसरातील शाळेची दुर्दशा झाली असून येथील गैरप्रकार रोखावेत, अशा विविध समस्यांचा पाढा मंगळवार पेठेतील शाहू बॅँक परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमात वाचला.
मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक या मार्गावरील दाटीवाटीच्या या परिसरात जासूद गल्ली, माने गल्ली, डाकवे गल्ली, राम गल्ली, गुलाब गल्ली, जरग गल्ली, नंगीवली तालीम, सुबराव गवळी तालीम, बजापराव माने तालीम मंडळ, बोडके तालीम, सणगर गल्ली तालीम, म्हादू गवंडी तालीम, आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.
वाहतुकीची कोंडी व त्यामुळे होणारे छोटे-मोठे अपघात हीच येथील प्रमुख समस्या असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. हा ताण हलका करण्यासाठी या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालावी, तसेच या मार्गावर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी कायमस्वरूपी एका वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. ही कुत्री वाहनधारकांचा पाठलाग करतात; त्यामुळे अपघात होतात. तसेच त्यांच्यापासून आबालवृद्धांना धोका आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे, असे मत यावेळी मांडण्यात आले.
या परिसरातील महाराणी ताराबाई हायस्कूल या शाळेची दुर्दशा झाली आहे. दरवाजे मोडकळीस आले आहेत. रात्री ही शाळा म्हणजे मद्यप्यांचा अड्डाच बनला आहे. रात्री मद्यपान करून टाकलेल्या रिकाम्या बाटल्यांच्या खचामुळे सकाळी शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पायांना गंभीर दुखापत होण्याचे प्रकार घडतात. तसेच या ठिकाणी गैरप्रकारही सुरू असतात, ते रोखावेत. शेजारी असणारे दत्ताजीराव शेळके उद्यान म्हणजे अस्वच्छतेचे आगार बनले आहे. येथील कचरा उठाव होत नाही, विजेची सोय नाही, उद्यानाची देखभाल करण्यासाठी माळी किंवा कर्मचारी नाही, त्यामुळे हे उद्यान फक्त नावापुरतेच असल्याचे सांगण्यात आले.
या परिसरातच विभागीय क्रीडासंकुल येते. त्या ठिकाणी मंगळवार पेठ व शिवाजी पेठेतील फुटबॉल खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी; कारण या परिसरात खेळाडूंना दुसरे मैदान नाही. वरचेवर स्वच्छता होत नसल्याने येथील गटारी तुंबलेल्या असतात. त्यामुळे डासांचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्याच्या समस्या भेडसावतात. यासाठी वरचेवर औषध फवारणी होणे गरजेचे आहे. महापालिकेचे कर्मचारी स्वच्छतेसाठी या ठिकाणी येत नसल्याच्या तक्रारीही यावेळी सांगण्यात आल्या.
औषध फवारणीची गरज
‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाकडे अनेक जागरूक नागरिकांनी सडेतोड मते मांडली. त्यांपैकी एका महिलेने मोबाईलवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत मंगळवार पेठ, साई मंदिरसमोरील कल्पना कृष्णात वडगावकर म्हणाल्या, मुख्य रस्त्यावरील गटारी व कोंडाळी अस्वच्छ आहेत. त्यामुळे भागात महापालिकेने औषध फवारणी करावी.
रस्ता एकेरी करावा
मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक आणि न्यू महाद्वार रोड ते बिनखांबी गणेश मंदिर हा रस्ता एकेरी करावा; कारण या रस्त्यावर सातत्याने किरकोळ छोटे-मोठे अपघात होतात. त्याचबरोबर न्यू महाद्वार रोडवर शाळा, हायस्कूल असल्याने हा परिसर शांतता क्षेत्र घोषित करावा. - प्रसाद जाधव
मर्क्युरी बल्ब लावा
जासूद गल्ली-महादेव मंदिर परिसरात मर्क्युरी बल्ब लावावा. तसेच महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. - नारायण चिले
वाहतुकीची कोंडी
रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याचबरोबर या रस्त्यावर दुतर्फा पार्किंग लावल्यामुळे वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. - महेश यादव
अवजड वाहतूक बंद करा
मिरजकर तिकटी ते संभाजीनगर या रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी. ही सर्व वाहने ध्यानचंद हॉकी स्टेडियममार्गे जावीत.
- सुनील समडोळीकर, वृत्तपत्र विक्रेते
उद्यानाची दुरवस्था
मंगळवार पेठेतील शेळके उद्यानाची दुरवस्था झाली आहे. येथे दुर्गंधी पसरली आहे. तसेच विद्युत खांब मोडकळीस आला आहे, याकडे महापालिकेने लक्ष द्यावे.
- संपत घाटगे
मद्याचा अड्डा बंद करा
महापालिकेच्या महाराणी ताराबाई शाळेमध्ये मद्याचा अड्डा झाला आहे. रोज या ठिकाणी रात्रीच्या वेळेत ओपन बार सुरू असतो. तो बंद व्हावा. - आनंदा महिपती चिले
स्पीडब्रेकरची गरज
मंगळवार पेठ परिसरात शाळा, हायस्कूल असल्याने सतत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी स्पीडब्रेकर (गतिरोधक) बसवावा.
- राजेंद्र मेंगाणे
पोलीस गस्त हवी
वाहतुकीच्या समस्येकडे कोणी लक्ष देत नाहीत. तसेच शाहू बँक हा परिसर मध्यवस्तीचा असल्याने रात्रीच्या वेळेत पोलिसांची गस्त असावी. रात्री दोन वाजेपर्यंत या रस्त्यावर एकही पोलीस फिरकत नाही. - सागर जाधव
मद्यपींचा बंदोबस्त करावा
सकाळी नऊ व सायंकाळी सहानंतर रहदारी वाढल्याने रोज एकतरी किरकोळ अपघात असतोच. त्याचबरोबर महाराणी ताराबाई शाळेच्या आवारात बसणाऱ्या मद्यपींचा बंदोबस्त करावा.
- जितेश शामराव कांबळे
फुटबॉलपटूंना मैदान हवे
भविष्याचा वेध घेऊन शासनाने क्रीडासंकुलामध्ये फुटबॉल खेळाडूंना मैदान उपलब्ध करून द्यावे. कारण, या भागात मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या परिसरातील खेळाडूंची संख्या जास्त आहे.
- प्रकाश रेडेकर, फुटबॉल खेळाडू.
रस्त्याचे काम निकृष्ट
जासूद गल्लीत ड्रेनेज व रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ते चांगले व्हावे.
- जयश्री मोहन यादव
गटारींची स्वच्छता हवी
गटारी अस्वच्छ आहेत. तसेच रस्ते खराब आहेत. गटारी तुंबत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे.
- गीता यशवंत यादव
आरोग्य धोक्यात
शाहू बँकेच्या रस्त्यावर वाहतूक जास्त असल्याने रस्ता ओलांडताना त्रास होतो. गटारींची स्वच्छता दोन दिवसांतून होते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
- शोभा अशोक कानकेकर,
जासूद गल्ली