कर्नाटक पोलिसांकडून बाची चेकपोस्ट नाक्यावर चंदगडमधील नागरिकांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:24 AM2021-04-06T04:24:33+5:302021-04-06T04:24:33+5:30
चंदगड तालुक्यातून कामानिमित्त बेळगावला जाणाऱ्या नागरिकांना कर्नाटक प्रशासनाकडून बेळगांव-वेगुर्ला महामार्गावर बाची (ता. जि. बेळगाव) येथे जाणीवपूर्वक अडवणूक करून त्रास ...
चंदगड तालुक्यातून कामानिमित्त बेळगावला जाणाऱ्या नागरिकांना कर्नाटक प्रशासनाकडून बेळगांव-वेगुर्ला महामार्गावर बाची (ता. जि. बेळगाव) येथे जाणीवपूर्वक अडवणूक करून त्रास देणे सुरू आहे. बस, खासगी वाहने, वडापमधून जाणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह टेस्ट केलेले किंवा लसीकरण प्रमाणपत्राची मागणी करत आहेत. ज्या नागरिकांकडे ही प्रमाणपत्रे नसतील त्यांना माघारी धाडत आहेत.
चंदगड तालुक्यासह सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, बांदा, गोवा व सीमाभागातील १०० खेड्यांतील नागरिकांचा दररोज बेळगाव संबंध येतो. सोने-चांदी, कापड, कृषी, आदी साहित्य खरेदीपोटी दररोज कोट्यवधी रुपये बेळगावला मिळतात असतात याचा विचार न करता केवळ कोरोनाच्या निमित्ताने, चंदगड, सावंतवाडी, वेंर्गुला येथून कर्नाटक राज्यात बेळगावला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना कर्नाटक पोलिसांकडून बाची चेकपोस्टवर अडविण्यात येत आहे.
कर्नाटकच्या बसेसना मात्र महाराष्ट्रात प्रवेश आहे. या सर्वांचा फटका प्रवाशांना बसून त्यांचे मात्र हाल होत आहेत. महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता वारंवार खरा त्रास मात्र चंदगडकरांसह सीमाभागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
बेळगाव लोकसभा निवडणुकीचे तसेच महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे कारण दाखवून अचानक सीमा बंद करण्यात येत आहेत. मात्र याच ठिकाणावरून खासगी दुचाकीसह चारचाकी वाहनांची तपासणी करून सोडण्यात येत आहेत कर्नाटक प्रशासनाकडून वारंवार कर्नाटकच्या सीमा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात येत आहेत. त्याचा त्रास दररोज बेळगाव येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांना बसत आहे.
------------------------
चंदगड तालुका व बेळगावचे व्यापारी, शैक्षणिक व वैद्यकीय संबंध आहेत. चंदगडचा भाजीपाला बेळगावला जातो. येथील हजारो लोक वैद्यकीय उपचारासाठी बेळगावला ये-जा करतात; पण आता बेळगाव प्रशासनाने सीमा बंद केल्याने सर्वांची मोठी अडचण झाली आहे.
------------------------
दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाने महाराष्ट्र, कर्नाटकसह देशात हाहाकार माजला असताना चंदगड तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नाही. याची बेळगावच्या जिल्हाधिकारी यांनी माहिती घ्यावी त्यानंतरच चंदगड तालुक्यातील नागरिकांची अडवणूक करावी.
- प्रभाकर खांडेकर, शिवसेना, उपजिल्हाप्रमुख, कोल्हापूर
------------------------
* फोटो ओळी : बाची (ता. जि. बेळगाव) येथे महाराष्ट्राच्या बसेस अडविणाऱ्या कर्नाटक पोलिसांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख जाब विचारताना.
क्रमांक : ०५०४२०२१-गड-०६