स्वातंत्र्यदिनी हातकणंगले शहरातील नागरिकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:16+5:302021-08-12T04:28:16+5:30
हातकणंगले-इचलकरंजी मार्गालगत असलेल्या गावतलावामध्ये शहरातील गटारीचे आणि पावसाचे दूषित पाणी एकत्र जमा होते. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे या गावतलावामध्ये ...
हातकणंगले-इचलकरंजी मार्गालगत असलेल्या गावतलावामध्ये शहरातील गटारीचे आणि पावसाचे दूषित पाणी एकत्र जमा होते. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे या गावतलावामध्ये दूषित पाण्याने दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात या तलावाभोवती असणाऱ्या रहिवाशांच्या घरांत हे दूषित पाणी शिरते. शहराच्या पूर्वेकडील श्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि शेतामध्ये हे दूषित पाणी जाऊन परिसरामध्ये मोठी दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. गावतलावाचे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये साचून राहिल्याने शेती नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे.
हातकणंगले गावतलावाचे पाणी शाहूकालीन मोरीतून हातकणंगले शहराच्या पश्चिमेकडील ओढ्याला सोडण्यात आले होते. मात्र शहरातून इचलकरंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने भराव टाकल्यामुळे ही शाहूकालीन मोरी पूर्णपणे बंद झाली आहे. दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गेली १० वर्षे तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनादिवशीच उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर सुभाष चव्हाण, रमेश स्वामी, बापूसाहेब ठोंबरे, विलास नर्मदे, बापूसो ठोंबरे, सुरेश बागे, मोहन नर्मदे, प्रकाश मोरे, सदाशिव भेंडवडे यांच्या सह्या आहेत.