दत्तवाड दुधगंगेच्या पात्रात वाळूसाठी नागरिकांची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:50+5:302021-04-10T04:22:50+5:30
मिलिंद देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दुधगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने वाळू उपशासाठी नागरिकांनी ...
मिलिंद देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दुधगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने वाळू उपशासाठी नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली आहे. दिवस-रात्र बेसुमार वाळू उपसा सुरु आहे तसेच पात्रात पाणी नसल्याने सात गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणी नसल्याने पिकेही वाळू लागली आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून दुधगंगा नदी कोरडी पडली आहे. यामुळे घोसरवाड, हेरवाड, टाकळीवाडी, दत्तवाड, जुने दानवाड, नवे दानवाड, अब्दुललाट या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऐन उन्हाळ्यात नदीला पाणी नसल्याने पाण्यासाठी हाल होत आहेत तर दुसरीकडे शेतातील उभी पिके वाळत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
नदीचे पात्र कोरडे पडल्याने उघड्यावर पडलेली वाळू नेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे नदीत पाणी नसल्याने महिला पाण्यासाठी सर्वत्र फिरत आहेत तर दुसरीकडे सध्या वाळू उपसा बंद असल्याने पात्रात उघड्यावर असलेली वाळू दुचाकी, बैलगाडीसह विविध वाहनांतून पोत्यात भरुन नेण्यासाठी झुंबड उडाली आहे. याकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
---------------------------
कोट - दत्तवाड ग्रामपंचायतीकडून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु असून, यासंबंधी नदीपात्रात इंटकचे काम सुरु आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने विनंती केल्यामुळे पाणी थांबवले आहे. नदीपात्रातील काम होताच दोन दिवसात पात्रात पाणी सोडले जाईल.
- हरिभाऊ कुंभार, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, कागल
फोटो - ०९०४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दुधगंगा नदीत पाणी नसल्याने कोरड्या पडलेल्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे.