कुडचे मळ्यातील नागरिकांचा इचलकरंजी नगरपालिकेत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:43+5:302021-06-22T04:16:43+5:30
: महिलांची संतप्त प्रतिक्रिया लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील कुडचे मळा परिसरात सारण गटारी, आरोग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची ...
: महिलांची संतप्त प्रतिक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील कुडचे मळा परिसरात सारण गटारी, आरोग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई यासह अन्य सुविधांचा अभाव आहे. या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिका प्रशासन वारंवार तक्रार दाखल करूनही उपाययोजना करत नाही. याचा जाब विचारण्यासाठी भागातील नागरिकांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या दालनात ठिय्या मारला. जोपर्यंत प्रशासन ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली.
नगराध्यक्षांनी त्वरित यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर भागातील नागरिक शांत झाले.
शहरातील कुडचे मळा आरोग्य सुविधांच्या बाबतीत नेहमीच चर्चेत आहे. गतवर्षी याच भागात कोरोना रुग्णसंख्या अधिक होती. तसेच गेल्या दोन दिवसांपूर्वी दोन तरुणांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे भागातील नागरिकांनी नगरपालिकेच्या करभाराविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. कुडचे मळा परिसरात सारण गटारीची मांडणी व्यवस्थित नाही. काही सखल, तर काही उंच भागावर गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. तसेच डेंग्यूचे रुग्ण आढळूनही औषध फवारणी केली जात नाही. अद्यापही काही डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. काही भागात नळाला कमी दाबाने व ठराविक कालावधीसाठी पाणी सोडत असल्याने पाण्याची टंचाई भेडसावत आहे. यासह अन्य सुविधांचा अभाव असल्याने भागातील संतप्त झालेल्या महिला व नागरिकांनी नगराध्यक्षांच्या दालनात ठिय्या मारला.
ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत येथून न जाण्याची भूमिका घेतली. त्यानंतर नगराध्यक्षांनी संबंधित अधिकारी व मक्तेदार यांना सदरचे काम त्वरित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले. यावेळी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, नगरसेवक सागर चाळके, रवी लोहार, अमृत भोसले, विनायक हावळ, निलेश बुचडे, गणेश पिसे, रुकसाना नदाफ, वहिदा मुजावर, सरुताई हुपरे यांच्यासह भागातील महिला व नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळी
२१०६२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत कुडचे मळ्यातील नागरिकांनी नगरपालिकेत ठिय्या मारला.