प्रदूषणाच्या विळख्यात नागरिक

By admin | Published: January 6, 2015 12:27 AM2015-01-06T00:27:53+5:302015-01-06T00:57:18+5:30

‘झूम’चा ढिगारा : निधीअभावी वाढणाऱ्या कॉलन्यांतील विकासकामांवर मर्यादा

Citizens of pollution | प्रदूषणाच्या विळख्यात नागरिक

प्रदूषणाच्या विळख्यात नागरिक

Next

‘झूम’ कचरा प्रकल्प, जैव कचरा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशा अनेक प्रकल्पांमुळे हवा, पाणी दूषित करणारा, शेतजमीन नापीक करणारा आणि आरोग्याच्या समस्या वाढविणारा प्रभाग म्हणून कदमवाडी-भोसलेवाडी या प्रभागाची ओळख आहे. प्रभागात नगरसेविकांचा संपर्क चांगला असला, तरी प्रभागाचा विस्तार मोठा असल्याने तसेच कॉलन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने निधीअभावी रस्ते, गटारींची कामे करण्यावर काही ठिकाणी मर्यादा आल्या आहेत.
‘झूम’ प्रकल्पाशेजारच्या देवार्डे मळ्यापासून भोसलेवाडी, कदमवाडी ते मार्केट यार्डजवळील जाधववाडीच्या हद्दीपर्यंत अशा भौगोलिक रचनेत हा प्रभाग विखुरला आहे. प्रभागाचा निम्म्याहून अधिक भाग पिकाऊ शेतवडीत प्लॉट पाडून विकसित झाला आहे. त्यामुळे ओम गणेश सोसायटी, सांगावकर पार्क, देवार्डे मळा, सोनल कॉलनी, साळोखे मळा, भोसले पार्क, कदम मळा, मदारी वसाहत, गणेश कॉलनी, महालक्ष्मीनगर, साई पार्क, आदी कॉलन्या विकसित झाल्या आहेत.
मागील निवडणुकीवेळी या प्रभागातील मतदारांची संख्या सहा हजारांच्या घरात होती. आता नवीन विकसित झालेल्या कॉलन्यांमुळे ही संख्या दहा हजारांवर गेली आहे. मूळ गावठाणातील राहणारे तसेच बाहेरून आलेले व येथे प्लॉट घेऊन, बांधकाम करून स्थायिक झालेला उच्च मध्यमवर्ग, मध्यम वर्ग व कष्टकरी लोकांचा या प्रभागात समावेश आहे. मूळ गावठाणात राहणाऱ्यांमध्ये शेतकरी कुटुंबांचा समावेश जास्त आहे.
भोसलेवाडी-कदमवाडी या प्रभागातील देवार्डे मळा येथील नागरिकांना झूम प्रकल्पामुळे ५०० मीटरच्या आत बांधकाम करता येत नाही, अशी तक्रार आहे. या प्रकल्पामुळे धूर, वास, मोकाट कुत्री यांचा त्रास होतो. पावसाळ्यात तर डास आणि माश्यांची पैदास वाढते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून यावर उपाय योजले जात नाहीत. यामुळे झूम प्रकल्प येथून हलवावा, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने झूमचा वास दूरवर सर्वत्र पसरलेला असतो. झूमचा त्रास जसा आरोग्यावर होतो, तसाच त्रास सांडपाण्याच्या प्रकल्पाचा शेतीवर होतो. सांडपाणी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे देवार्डे मळा, भोसलेवाडी, कदमवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. या जमिनीत समाधानकारक पीक घेता येत नाही. पिकांचे उत्पन्न घटते. सतत पाणी शेतात मुरत असल्याने जमिनीचा कस कमी झाला आहे. भातपीक कापायला आले, तरी शेतात साचलेल्या पाण्यामुळे ते वेळेत कापता येत नाही. पाण्यामुळे उसाची तोड वेळेत होत नाही. त्यामुळे ऊस वेळेत कारखान्याला जाऊ शकत नाही. इथल्या शेतकऱ्यांनी महापालिकेकडे नुकसानभरपाई मागितली आहे.
या प्रभागात पिण्याच्या पाण्याची अडचण नाही. रस्त्याच्या गटारींची स्थिती बऱ्यापैकी आहे. काही ठिकाणी वेळेत साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी आहेत. नवीन विकसित झालेल्या कॉलन्यांत अद्याप रस्ते, गटारींची सोय झालेली नाही. रस्ते, गटारी नसल्यामुळे पावसाळ्यात दलदल होते. लोकांचे खूप हाल होतात. साहजिक त्यामुळे आरोग्याच्या समस्या आहेत.
नगरसेविकांचा संपर्क चांगला आहे. कदमवाडी व भोसलेवाडी चौकात हापमास्क दिवे लावल्यामुळे रात्रीच्या वेळी हे दोन चौक उजळून निघतात. भोसलेवाडी व्यायामशाळे- शेजारी गार्डनमध्ये झाडे लावून खेळणी बसविल्यामुळे लहान मुलांना खेळण्याची सोय झाली आहे.


देवार्डे मळा ते जाधववाडीच्या हद्दीपर्यंत विस्तीर्ण असा प्रभाग असल्यामुळे विकासकामांना बजेट पुरत नाही. तरीही प्रभागात सव्वा कोटीची विकासकामे केली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडूनही काही फंड मिळाला. चौकात हापमास्क दिवे बसविले. गटारी, रस्त्यांची कामे केली. खुल्या जागेवर मुलांसाठी खेळणी बसविली. भोसलेवाडी चौक ते एस.टी.पी. प्लँट रस्ता ३० लाखांचा केला. गावतळे सुशोभीकरणासाठी पाच लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रभागातील नवीन विकसित झालेल्या कॉलन्यांतील लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत; परंतु निधीची कमतरता भासते. निधी पुरत नाही.
- स्मिता वैभव माळी,
नगरसेविका प्रभाग क्रं. ७, भोसलेवाडी-कदमवाडी

Web Title: Citizens of pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.