सोनतळीत नागरिकांनीच रस्त्यावरील खड्डे बुजविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:22+5:302021-02-15T04:21:22+5:30
वडणगे : सोनतळी, ता. करवीर येथील मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर ...
वडणगे : सोनतळी, ता. करवीर येथील मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर युवकांनीच खराब रस्त्यावरील खड्डे लोकवर्गणीतून मुरमाने भरून घेत प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे जवळपास शंभरावर नागरिकांनी रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये सहभाग घेतला.
सोनतळी परिसरातील चिखली पुनर्वसन वसाहत, रजपूतवाडी, निगवे व पन्हाळा रोडला जोडणारा मुख्य रस्ता गेली अनेक वर्षे खराब झाला आहे. पन्हाळा, जोतिबासह चार गावांना जोडणाऱ्या या रस्त्यावर मोठी रहदारी असते. रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक व प्रवाशांचे हाल होत होते. ग्रामस्थांनी वेळोवेळी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनदेखील प्रशासनाने याकडे कानाडोळा केला. अखेर ग्रामस्थांनी रविवारी लोकवर्गणीतून मुरमाचे पाच डंपर आणून खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. दिवसभरात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच नागरिकांना अखेर रस्त्यावर यावे लागल्याचे मदन वरुटे यांनी सांगितले.
यावेळी येथील मदन वरुटे, सनी यादव, राहुल कांबळे, शशिकांत यादव, उत्तम माने, बळी कळके, अनिल पाटील, अशोक वरुटे, शुभम मांगलेकर, शुभम बागडी यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
चौकट : ० लाखाचा निधी : या रस्त्यासाठी आ. पी. एन. पाटील यांच्या फंडातून २० लाखांचा निधी मंजूर असून रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती चिखलीचे माजी सरपंच केवलसिंग रजपूत व माजी उपसरपंच धनाजी चौगले यांनी दिली.
फोटो : १४ सोनतळी रस्ता
सोनतळी, ता. करवीर येथील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामात सहभागी झालेले युवक.