ऑनलाईन घरफाळा भरण्याकडे नागरिकांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 03:07 PM2020-12-03T15:07:53+5:302020-12-03T15:12:39+5:30
Muncipal Corporation, tax, kolhapurnews तासभर रांगेत उभे राहून घरफाळा भरण्यापेक्षा तो ऑनलाईन भरण्याकडे शहरातील नागरिकांचा कल वाढला आहे. गेल्या आठ महिन्यांत महानगरपालिकेकडे पाच कोटी ५१ लाख ६७ हजारांचा घरफाळा ऑनलाईन जमा झाला. ऑनलाईन घरफाळा भरण्याच्या सुविधेचा १६ हजार ३७० मालमत्ताधारकांनी लाभ घेतला.
कोल्हापूर : तासभर रांगेत उभे राहून घरफाळा भरण्यापेक्षा तो ऑनलाईन भरण्याकडे शहरातील नागरिकांचा कल वाढला आहे. गेल्या आठ महिन्यांत महानगरपालिकेकडे पाच कोटी ५१ लाख ६७ हजारांचा घरफाळा ऑनलाईन जमा झाला. ऑनलाईन घरफाळा भरण्याच्या सुविधेचा १६ हजार ३७० मालमत्ताधारकांनी लाभ घेतला.
महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. दि. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये शहरातील ५९ हजार ८८९ मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्राकडे २८ कोटी ७६ लाख १४ हजार १३४ रुपयांच्या घरफाळ्याची रक्कम जमा केली, तर १६ हजार ३७० मालमत्ताधारकांनी ऑनलाईनद्वारे पाच कोटी ५१ लाख ६७ हजार ८८६ रुपयांच्या घरफाळ्याची रक्कम जमा केली.
कोरोनामुळे महापालिकेवर आर्थिक ताण वाढला असून, या परिस्थितीत नागरिकांनी आपला देय असणारा घरफाळा आणि पाणीपट्टीची रक्कम तत्काळ भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे. घरफाळा वसुलीचे काम नियंत्रण अधिकारी तथा उपआयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त विनायक औंधकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गतीने सुरू ठेवले आहे.
दोन टक्के दंडाची आकारणी सुरू
घरफाळ्याच्या थकीत रकमेवर दि. १ डिसेंबर २०२० पासून दोन टक्के दंडाची आकारणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या घरफाळ्याची रक्कम तत्काळ भरून जप्ती, तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहनही प्रशासक बलकवडे यांनी केले आहे.