‘अंबामाता की जय’च्या गजरात नगरप्रदक्षिणा
By admin | Published: October 22, 2015 12:35 AM2015-10-22T00:35:42+5:302015-10-22T00:53:29+5:30
मार्गावर फुलांच्या पायघड्या : भाविकांची प्रचंड गर्दी; पारंपरिक वाद्यांचा दणदणाट
कोल्हापूर : ‘अंबामाता की जय...’चा गजर, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, रांगोळी व फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, रोषणनाईक असा शाही लवाजमा, फुलांनी सजलेले चांदीचे वाहन आणि त्यात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती, नागरूपी वाहनावर होणारा फुलांचा वर्षाव... अशा मंगलमय वातावरणात बुधवारी रात्री देवीची नगरप्रदक्षिणा झाली. वर्षातून एकदा अष्टमीला नगरवासीयांची भेट घेण्यास आलेल्या देवीचा हा शाही सोहळा भाविकांनी नजरेत साठविला.
फुलांनी सजविलेल्या वाहनात रात्री साडेनऊला देवीची उत्सवमूर्ती विराजमान झाली. पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजू जाधव व पत्नी मीना जाधव, दीप्ती दिलीप जाधव यांच्या हस्ते वाहनाचे पूजन झाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, दादा परब, राजेंद्र देशमुख, बी. एन. पाटील, सुदेश देशपांडे, पुजारी प्रकाश भोरे, आदिनाथ सांगळे उपस्थित होते. तोफेची सलामी दिल्यानंतर महाद्वारातून वाहन नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडले. पारंपरिक वाद्यांसह पुण्याच्या झांजपथकाने लक्ष वेधले. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रांगोळी, फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. आकर्षक, रंगीबेरंगी विद्युत प्रकाशझोताने मार्ग उजळून निघाला होता. महाद्वारातून वाहन गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे भवानी मंडपात आले. या ठिकाणी श्री अंबाबाई व तुळजाभवानीची भेट झाली. त्यानंतर छत्रपती घराण्याने आरती केली. तेथून वाहन गुरुमहाराजांच्या वाड्यावर आले. प्रदक्षिणा मार्गावर विविध संस्थांनी प्रसाद वाटप केले. बिनखांबी गणेश मंदिरमार्गे वाहन रात्री बाराच्या सुमारास पुन्हा महाद्वारात आले आणि नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर देवीची जागराची पूजा बांधली.