शहर विकास आघाडी -कारंडे गट एकत्रित लढणार
By admin | Published: May 28, 2016 12:38 AM2016-05-28T00:38:31+5:302016-05-28T00:47:29+5:30
आगामी इचलकरंजी निवडणूक : अजित जाधव यांची माहिती
इचलकरंजी : येथील नगरपालिका शिक्षण मंडळाच्या निवडीनंतर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या निवडीप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीतही शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गट एकत्रितपणे निवडणूक लढविणार असून, जनतेसमोर जाताना भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका, असा आमचा अजेंडा असणार आहे, असे आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी सांगितले. नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती निवडीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
नगरपालिका शिक्षण मंडळावरील ५० वर्षांची काँग्रेसची सत्ता मोडून काढत सहा महिन्यांपूर्वी शहर विकास आघाडीने सत्ता काबीज केली.
अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करून शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शाळांमध्ये आवश्यक बदल सुरू केले. मावळते सभापती राजू हणबर यांनी कारकीर्द यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर शहर विकास आघाडीचे इम्रान बागवान यांना संधी दिली आहे. तर उपसभापतिपदी कारंडे गटाचे नितीन कोकणे हेच राहणार आहेत. याप्रमाणेच आगामी नगरपालिकेची निवडणूकही आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गट एकत्रित लढविणार असून, त्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिक्षण मंडळाचे नूतन सभापती इम्रान बागवान, नितीन कोकणे, तानाजी पोवार, महादेव गौड, विलास रानडे उपस्थित होते. (वार्ताहर)