शहरवासीयांना लसीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:13+5:302021-04-30T04:28:13+5:30
कोल्हापूर : शहरात महानगरपालिकेच्या तीन नागरी आरोग्य केंद्रांवर बुधवारी केवळ ३४३ नागरिकांचे लसीकरण झाले. गेल्या दोन दिवसांपासून लस संपल्यामुळे ...
कोल्हापूर : शहरात महानगरपालिकेच्या तीन नागरी आरोग्य केंद्रांवर बुधवारी केवळ ३४३ नागरिकांचे लसीकरण झाले. गेल्या दोन दिवसांपासून लस संपल्यामुळे शहरवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. आज, गुरुवारी चार केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार असून बाकीची केंद्रे बंद राहणार आहेत.
शहरात सावित्रीबाई फुले, राजारामपुरी व फुलेवाडी येथील आरोग्य केंद्रे, सीपीआर हॉस्पिटल व खासगी रुग्णालय मिळूण एकूण ३४३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आज, गुरुवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, राजारामपुरी, फुलेवाडी व सीपीआर या चार केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस चालू राहणार आहे. सीपीआर हॉस्पिटल येथे कोविशिल्ड लस नसल्याने पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण बंद राहणार आहे.
महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्याने पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण बंद राहणार आहे.
मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात लस उपलब्ध असून अडीचशे रुपये शुल्क आकारून लसीकरण करून घेता येईल. यामध्ये मसाई हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, जोशी हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, गंगाप्रकाश हॉस्पिटल या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस चालू राहील. तसेच ॲपल, स्वस्तिक, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, ओमसाई अँकोलॉजी, ॲस्टर आधार हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस सुरू राहणार आहे.
आजचे लसीकरण-
सावित्रीबाई फुले -१५, राजारामपुरी- १८, फुलेवाडी- २१, सीपीआर- ८०, खाजगी हॉस्पिटलमध्ये २०९
- आतापर्यंतचे लसीकरण-
पहिला डोस - १,०६,४८८
- दुसरा डोस - २३,९३५