शहरात नव्या आठ अद्ययावत शाळांची भर
By Admin | Published: June 19, 2015 11:55 PM2015-06-19T23:55:22+5:302015-06-20T00:33:10+5:30
प्रवेशाबाबत ठरणार धोरण : ‘मनपा’च्या बंद शाळा होणार नव्याने सुरू
संतोष पाटील - कोल्हापूर -शहरातील बंद पडलेल्या आठ शाळा एकाचवेळी प्रीमियम रक्कम भरून एक रुपया प्रतिचौरस फूट भाड्याने नामवंत शिक्षण संस्थांना देण्याचा विचार महापालिका प्रशासन करीत आहे. या शाळेत शहरातील गरीब व गरजू अशा २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे बंधनकारक असेल. हा प्रवेश कसा व कोणाच्या शिफारशीने द्यावा, याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. बंद शाळांच्या माध्यमातून शहरात आणखी आठ नवीन अद्ययावत शिक्षण केंद्रांची भर पडणार आहे.
प्राथमिक शिक्षण मंडळाकडे ७५ शाळा आहेत. त्यातील ११ शाळा बंद आहेत पैकी ८ शाळा भाड्याने देण्याची योजना प्रशासनाने आखली होती. या शाळांना मिळणारा प्रतिसाद व त्यातून मिळणारे उत्पन्न याचा अभ्यास करून उर्वरित ३ शाळांचाही लिलाव करण्यात येणार होता. मात्र, रेडिरेकनरच्या दराप्रमाणे होणारे मासिक लाखाचे भाडे देण्यास कोणी तयार न झाल्याने मध्यवस्तीतील या बंद शाळांमधून उत्पन्न मिळविण्याचा डाव प्रशासनाचा फसला. मात्र, यास शिक्षणसंस्थांनी प्रतिसादच दिला नाही.
सध्या महापालिकेच्या चौथी ते सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या ५९ शाळांतून ९५९७ विद्यार्थी शिक्षण घेतात. परिसरातील विद्यार्थ्यांना सोयीच्या असणाऱ्या या शाळेत दहा वर्षांपूर्वी किमान ३५ हजारांहून अधिक विद्यार्थी होते. दिवसेंदिवस शिक्षणाचा दर्जा खालावल्याने आज एक चतुर्थांश विद्यार्थीच महापालिका शाळेत उरलेत. त्यातील २५ शाळेत किमान पटसंख्याही नाही. शहरातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांची प्राथमिक शिक्षणाची भयावह परिस्थिती सुधारण्यासाठीच बंद पडलेल्या शाळा मोठ्या व नामवंत शिक्षण संस्थांना चालविण्यास देण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा विचार आहे. लवकरच यासाठीची निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)
२० वर्षांचा करार
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या बंद पडलेल्या शाळा शिक्षण संस्थांना चालविण्यास देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एक रुपया प्रति चौरस फूट नाममात्र भाडे आकारले जाणार आहे. यासाठी प्रीमियम रक्कम स्पर्धा निविदेद्वारे भरून घेतली जाईल. बंद शाळांच्या इमारतींमध्ये आवश्यक बदल करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असेल. २५ टक्के प्रवेश महापालिकेच्या शाळांतील किंवा मनपाने सुचविलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नाममात्र शैक्षणिक फीमध्ये द्यावा लागेल. २० वर्षांनंतर या शाळेची इमारत जशी असेल तशी महापालिकेला हस्तांतरित करावी लागणार असल्याचे महापालिकेचे प्रभारी इस्टेट आॅफिसर संजय भोसले यांनी सांगितले.
या शाळांचे होणार नूतनीकरण
अण्णा भाऊ साठे विद्यालय
(मातंग वसाहत, राजारामपुरी)
रंगराव साळोखे विद्यालय (सुसर बाग)
महाराणी विद्यालय (मंगळवार पेठ)
पद्माराजे विद्यालय (शुक्रवार पेठ)
मुलींची शाळा क्र. ५ (शाहूपुरी)
नेहरू कन्या शाळा (रविवार पेठ)
विजयमाला कन्या विद्यालय (राजारामपुरी)
पद्माराजे विद्यालय (खोलखंडोबा)