मुसळधार पावसाने कोल्हापूर शहर गारठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:13 AM2018-07-17T00:13:19+5:302018-07-17T00:13:24+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले, दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने संपूर्ण शहर दिवसभर थंडीने गारठले होते. शहरातील सखल भागांत पाणी साचले, तर नाल्यांना नदीचे स्वरूप आले. अनेक ठिकाणी घरांत, तळघरांत पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. राजारामपुरी जनता बझार चौक, राजहंस प्रेस, बागल चौक परिसर, महावीर गार्डन परिसर, शास्त्रीनगर, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, बाबूभाई परिख पूल, आदी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. अनेक मार्गांवर वाहनधारकांना कसरत करावी लागली; त्यामुळे संपूर्ण शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती.
राजाराम बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या दिशेने वाढत आहे. सायंकाळी सात वाजता पाणी पातळी ४१ फुटांपर्यंत वाढली होती. शहरातील अनेक भागांत झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
गेले चार दिवस मुसळधार पावसाने कोल्हापूर शहराला झोडपून काढले. जिल्ह्यात व शहरात पावसाचा सोमवारी दिवसभर जोर कायम राहिल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे; त्यामुळे नदीकाठच्या तसेच नाल्याकाठच्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
राजहंस प्रेस परिसरात तळ्याचे स्वरूप
जयंती नाल्याची पाणी पातळी वाढल्याने पाणी पात्र सोडून बाहेर पडले; त्यामुळे नागाळा पार्क परिसरातील राजहंस प्रिंटिंग प्रेस ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाºया मार्गावर पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले. हे पाणी राजहंस प्रेसमध्ये घुसले होते. अग्निशमन दलाने पाणी बाहेर काढले. त्या परिसरात काही तळघरांत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही पाणी साचल्याने तेथील काही तळघरांत पाणी शिरले होते. महावीर गार्डन परिसरातील हत्ती हाऊसमध्येही शिरलेले पाणी अग्निशमन दलाने बाहेर काढले.
लाईन बझारमध्ये धावत्या मोटारीवर झाड पडले
शहरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लाईन बझार परिसरात पद्मा पथक चौकानजीक रस्त्याकडेचे झाड भरधाव वेगाने धावणाºया मोटारीवर पडल्याने मोटारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने या मोटारीतील दोेघांना कोणतीही इजा झाली नाही; पण याच झाडाची फांदी शेजारील घरावर पडल्याने घराची भिंंत पडली. याशिवाय बिंदू चौक, शिवाजी उद्यमनगरातील युनिक अॅटो सर्व्हिस सेंटरनजीक, शिवाजी पार्क परिसरातील गद्रे गार्डन शेजारी रस्त्यावर, राजारामपुरीतील साई कार्डियाक चौकात, नागाळा पार्कमधील सरोज अपार्टमेंटसमोर रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली. अग्निशमन दलाच्या पथकाने झाडे बाजूला करून वाहतूक खुली केली.