कोल्हापूर शहरात तिन ठिकाणी घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 01:19 PM2018-11-09T13:19:06+5:302018-11-09T13:20:48+5:30
दिवाळी सणाच्या धामधुमीत चोरट्यांनी शहरासह उपनगरात धुमाकूळ घातला. मुंबई पोलीसाच्या फुलेवाडी रिंगरोडवरील राहत्या घरासह तिन्ह ठिकाणी घरफोड्या करुन सोळा तोळे सोन्याचे दागिने, रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे गुरुवारी (दि. ८) उघडकीस आले. वाढत्या घरफोड्यांनी पोलीसांची तारांबळ उडाली असून नागरिकांत भिती पसरली आहे.
कोल्हापूर : दिवाळी सणाच्या धामधुमीत चोरट्यांनी शहरासह उपनगरात धुमाकूळ घातला. मुंबई पोलीसाच्या फुलेवाडी रिंगरोडवरील राहत्या घरासह तिन्ह ठिकाणी घरफोड्या करुन सोळा तोळे सोन्याचे दागिने, रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे गुरुवारी (दि. ८) उघडकीस आले. वाढत्या घरफोड्यांनी पोलीसांची तारांबळ उडाली असून नागरिकांत भिती पसरली आहे.
अधिक माहिती अशी, अरिहंत रेसिडेन्सी, क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथे रविराज रघुनाथ चौगले (३०) हे कुटूंबासह राहतात. ते मुंबई पोलीस दलात नोकरीस आहेत. दिवाळी निमित्त ते पत्नी शर्वरी असे दोघेजण घराला कुलूप लावून किरकोळ साहित्य आणणेसाठी बाजारात गेल्या होत्या.
खरेदी करुन परत आले असता घराच्या मुख दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चार तोळे सोन्याचे दागिने व चार हजार रुपये चोरट्याने चोरुन नेलेचे निदर्शनास आले. शिवराज हेमंतराव मोहिते (वय ३५) हे यशोदा बंगलो शिवाजी पार्क येथे राहण्यास आहेत.
ते दिवाळी सुट्टीला आपले गावी रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड , जि. सातारा) येथे कुटूंबासह गेले होते. त्यांच्या बंद घराच्या पाठीमागील खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी बेडरुममधील तिजोरीतील पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्यामध्ये चेन, अंगठी, लॉकेट, बदाम यांचा समावेश होता.
रुईकर कॉलनी येथे अमितकुमार सुनिलकुमार वाडेकर (४२) हे कुटूंबासह राहतात. त्यांच्या घराचे हॉलमधील लोखंडी खिडकीचे गज वाकवुन बेडरुममधील सात तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्यामध्ये गंठण, चेन, बांगडी, हिऱ्याची अंगठी, कानातले टॉप्स होते. याप्रकरणी करवीर आणि शाहुपूरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दिवाळी सणामध्ये चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिले आहे.