कुरुंदवाड शहर शंभर टक्के पुरबाधित घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:34+5:302021-08-12T04:28:34+5:30
कुरुंदवाड : शहराला महापुराने वेढा घातल्याने शहरवासीयांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शहर शंभर टक्के पूरबाधित घोषित ...
कुरुंदवाड : शहराला महापुराने वेढा घातल्याने शहरवासीयांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शहर शंभर टक्के पूरबाधित घोषित करण्याचा ठराव पालिका विशेष सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते.
महापुराने शहर जलमय झाले होते. शहराच्या चारही बाजूंनी पाणी आल्याने शहराला बेटाचे स्वरूप आले होते. त्यामुळे शहराला शंभर टक्के पूरग्रस्त जाहीर करण्यासाठी पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ऑनलाईन सभेचे आयोजन केले होते.
यावेळी नगराध्यक्ष पाटील, उपनगराध्यक्ष सुनील चव्हाण, नगरसेवक अक्षय आलासे, उदय डांगे, अनुप मधाळे आदींनी शहरातील पूरकाळातील परिस्थिती आणि शासनाकडून केल्या जाणाऱ्या पंचनाम्याची वास्तव स्थिती मांडली. चुकीच्या पद्धतीने पंचनामा होत असल्याने शहर शंभर टक्के पूरग्रस्त जाहीर करुन सरसकट शासनाची मदत मिळावी, असा एकमताने ठराव करण्यात आला. यावेळी नगरसेवक फारूक जमादार, दीपक गायकवाड, समरीन गरगरे, मुमताज बागवान, गीता बागलकोटे, प्राजक्ता पाटील आदी उपस्थित होते.