शहर चकाचक; मात्र तिकटी खड्ड्यातच

By admin | Published: June 9, 2015 01:09 AM2015-06-09T01:09:10+5:302015-06-09T01:17:31+5:30

सव्वादोन कोटी रुपयांची गरज : शहरातील १५० हून अधिक रस्ते झाले चकाचक

City pulsation; Only in the ditch pits | शहर चकाचक; मात्र तिकटी खड्ड्यातच

शहर चकाचक; मात्र तिकटी खड्ड्यातच

Next

संतोष पाटील -कोल्हापूर -कासवगतीची ठरलेली १०८ कोटी रुपयांची नगरोत्थान योजना आता पूर्णत्वाकडे जात आहे. तसेच इतर शासकीय निधीतून १५० हून अधिक लहान-मोठ्या रस्त्यांच्या बांधणी व दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील रस्ते चकचकीत झाल्याचे चित्र असले तरी दोनहून अधिक प्रभागांतून जाणारे शहरातील प्रमुख १२ रस्ते मात्र खड्ड्यांतच राहिले आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने बिनकामाच्या असलेल्या या रस्त्यांसाठी निधी देण्यास नगरसेवक अनुत्सुक आहेत. या रस्त्यांसाठी २.१७ कोटी रुपयांच्या निधीची जोडणी करताना प्रशासनाच्या मात्र नाकीनऊ आले आहे.
सहा महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या नगरसेवक तसेच कथित सामाजिक कार्यकर्त्यांवर फौजदारी दाखल करण्याची तंबी प्रशासनाने दिली. सभागृहाने दर्जेदार रस्त्यांसाठी आणाभाका घेतल्या. प्रशासनाने अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाईचा इशारा दिला.
रस्त्याच्या कामाबाबत ‘बार चार्ट’ तयार करून सर्वच संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष कामावर पाहणी करून, रस्त्यांच्या दर्जाबाबत तपासणी करून त्याप्रमाणे हालचाल रजिस्टरमध्ये नोंद केली. दर्जाबाबत हयगय झाल्यास संबंधित अभियंत्यांना जबाबदार धरून प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईचे नियोजन केले. इतकी तयारी करूनही नियोजन, इशारे, उद्घाटनांचा ‘शो’ यांत अडकलेले शहरातील या रस्त्यांचे काम प्रत्यक्षात सुरू करून ‘नगरोत्थान’बरोबरच हे रस्तेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाने यशस्वी प्रयत्न केला.
शहरातील रस्ते चकचकीत झाल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र प्रत्यक्षात दोनहून अधिक प्रभागांतून जाणाऱ्या रस्त्यांना डांबर लागले नाहीच. प्रभागातील लहानशा बोळात कॉँक्रीट किंवा पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी धडपडणारे लोकप्रतिनिधी या प्रमुख रस्त्यांसाठी निधी देताना मात्र हात आखडता घेत आहेत.
आमदार-खासदार निधीतून पैसे खर्ची घालताना मतदार व त्यांची संख्या नजरेसमोर धरली जाते. या रस्त्यांची मतदार व निवडणुकीच्या दृष्टीने नगरसेवकांना उपयोगिता नसल्यानेच यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.


दोन-दोन प्रभागांतील सीमेवरील रस्ते तयार करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. लवकरच यासाठी विशेष निधीची तरतूद करून या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचा प्रशासन प्रयत्न करीत आहे.
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

Web Title: City pulsation; Only in the ditch pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.