कोल्हापूरचे आरोग्य: इचलकरंजी, गडहिंग्लज बनले 'हेल्थ सेंटर्स'; डिजिटल एक्सरे, सोनाग्राफी, डायलेसिसचीही सोय

By समीर देशपांडे | Updated: January 3, 2025 16:44 IST2025-01-03T16:44:22+5:302025-01-03T16:44:44+5:30

समीर देशपांडे  कोल्हापूर : राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाही आता कात टाकत असून गडहिंग्लज, इचलकरंजीला सिटी स्कॅन केले जाते आणि ...

City Scan Digital X ray Sonography and Dialysis are also available in Government Hospitals in Gadhinglaj Ichalkaranji kolhapur district | कोल्हापूरचे आरोग्य: इचलकरंजी, गडहिंग्लज बनले 'हेल्थ सेंटर्स'; डिजिटल एक्सरे, सोनाग्राफी, डायलेसिसचीही सोय

कोल्हापूरचे आरोग्य: इचलकरंजी, गडहिंग्लज बनले 'हेल्थ सेंटर्स'; डिजिटल एक्सरे, सोनाग्राफी, डायलेसिसचीही सोय

समीर देशपांडे 

कोल्हापूर : राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाही आता कात टाकत असून गडहिंग्लज, इचलकरंजीला सिटी स्कॅन केले जाते आणि मुंबई, बंगळुरू व पुण्यातून तातडीने त्याचा अहवाल देण्याची सोय शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाली आहे. सिटी स्कॅन, डिजिटल एक्से, सोनोग्राफी आणि डायलेसिसचीही सोय उपलब्ध झाली आहे. या सर्व यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक असून अनेक ठिकाणी किरकोळ निधीसाठी यंत्रणा ठप्प होण्याचाही प्रकार पहावयास मिळत आहे.

कोल्हापूर शहरातच कसबा बावड्याजवळील सेवा रुग्णालय, गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय आणि इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालय ही अतिमहत्त्वाच्या सेवा देणारी आरोग्य केंद्रे बनली आहेत. या ठिकाणी गेल्या दोन वर्षात आवश्यक मनुष्यबळ पुरवठा, यंत्रसामग्री पुरवण्यात आल्यामुळे येथे एकाच ठिकाणी अनेक सुविधा रुग्णांना उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

कसबा बावड्याच्या सेवा रुग्णालयात पूर्णवेळ रेडिओलॉजिस्ट आहे. लहान फिजिओथेरपीची गरज असणाऱ्या बालकांसाठी ‘डे केअर युनिट’आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या तपासण्या करून त्यांना मार्गदर्शन करणारी यंत्रणाही आहे. १५० हून अधिक नागरिक रोज या ठिकाणी येतात. कर्करोगाच्या रुग्णांसाठीही दैनंदिन तपासणी असून या ठिकाणी या रुग्णांचे समुपदेशनही करण्यात येते. औषध, गोळ्या दिल्या जातात. नाक, कान, घशाच्या सर्व चाचण्या येथे मोफत होतात.

इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात डायलेसिसच्या चार मशिन्स तयार आहेत. त्यासाठी १६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. गेल्या एक महिन्यापासून रोज नेत्रोपचाराची सोय या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. बहुतांशी सर्व रुग्णालयांसाठी जनरेटरचा पुरवठा करण्यात आला आहे. सोनोग्राफी मशिन्स पुरवण्यात आल्या आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी शीत शवपेट्या पुरवण्यात आल्या आहेत.

सेवा रुग्णालय, आयजीएम, कोडोली आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पूर्णवेळ रेडिओलॉजिस्ट देण्यात आल्यामुळे अहवाल वेळेत देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आठवड्यातून एक वेळ गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयात रेडिओलॉजिस्टची सोय करण्यात आली आहे.

वर्षभरापूर्वी शासनाने कृष्णा डायग्नोसिस कंपनीच्या माध्यमातून डिजिटल एक्सरे आणि सिटी स्कॅनची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय आणि इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात सिटी स्कॅन केले जाते किंवा डिजिटल एक्स-रे काढला जातो. या कंपनीच्या बंगळुरू, मुंबई, पुणे येथील विशेषतज्ज्ञांकडे तो ऑनलाइन पाठविण्यात येतो. जर आरेाग्याचा गंभीर प्रश्न असेल तर तातडीने संबंधितांकडून त्याचा अहवाल दिला जातो. त्यानुसार पुढच्या प्रक्रियेचा निर्णय घेण्यात येतो.

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील आरोग्य व्यवस्था

  • ग्रामीण रुग्णालये - १५
  • २०० बेडचे सामान्य रुग्णालय - ०१
  • १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय - ०१
  • ५० बेडची उपजिल्हा रुग्णालये - ०४
  • एकूण शासकीय रुग्णालये - २१


निधीची अडचण

महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील सर्व रुग्णालयांमधून मोफत उपचाराची घोषणा केल्याने आता केस पेपरचे पैसेही जमा केले जात नाहीत. याआधी केसपेपरच्या माध्यमातून जमा झालेला निधी स्थानिक पातळीवर छोट्या, माेठ्या गोष्टींसाठी वापरता येत होता. परंतु आता केसपेपरच नसल्याने स्थानिक पातळीवरील गरजा भागविण्यासाठी रुग्णालयाकडे पैसेच नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती देईल त्या निधीवरच अवलंबून रहावे लागते. हा मिळालेला निधी अधिकाधिक औषधांच्या खरेदीसाठीच वापरावा लागतो.

Web Title: City Scan Digital X ray Sonography and Dialysis are also available in Government Hospitals in Gadhinglaj Ichalkaranji kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.