शहर रस्त्यावर, कोरोना मानगुटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:58+5:302021-05-16T04:21:58+5:30

कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची पूर्वतयारी म्हणून शहरात खरेदीसाठी बाजारपेठेत उसळलेल्या गर्दीने शनिवारी ‘ब्रेक द चेन’ या आवाहनाला ...

On city streets, on Corona Manguti! | शहर रस्त्यावर, कोरोना मानगुटीवर!

शहर रस्त्यावर, कोरोना मानगुटीवर!

Next

कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची पूर्वतयारी म्हणून शहरात खरेदीसाठी बाजारपेठेत उसळलेल्या गर्दीने शनिवारी ‘ब्रेक द चेन’ या आवाहनाला ब्रेक करून त्याचा पार फज्जा उडवला. दूध, बेकरी पदार्थ भाजीपाला, चिरमुरे, फरसाण, कडधान्य अशा साहित्यांच्या खरेदीसह पेट्रोलसाठी मोठ्या रांगा होत्या. तर आता आठ दिवस नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही म्हणून पोलीस प्रशासनानेही कारवाईतून थोडी सूट दिली.

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असून, रोजची रुग्णसंख्या हजार- दीड हजाराच्यावर जात आहे. तर ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या अडीच हजारांहून अधिक आहे, त्याप्रमाणात वैद्यकीय यंत्रणा नाही. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून जिल्ह्यात पुढील रविवारपर्यंत (दि. २३) आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र या आठ दिवसांची तजवीज करून साहित्यांचा साठा करून ठेवण्यासाठी शहरात सकाळी ७ ते ११ या वेळेत प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे गेल्या महिन्याभरात प्रथमच शहरातील प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम झाले होते.

बेकरी पदार्थ संपले..

आता सगळेच २४ तास घरात बसून राहणार असल्याने सारखं काही खाण्यासाठी बेकरी पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. ब्रेड, खारी, टोस्ट, पावभाजीचे पाव, फरसाण, शेवचिवडा, यासह जिभेचे चाचेले पुरवणाऱ्या चटपटीत पदार्थांना अधिक मागणी होती. आठ दिवसांचा एकदाच स्टॉक करावा लागल्याने अनेकांच्या पिशव्या भरून हे साहित्य होते. त्यामुळे बेकरीतील हे पदार्थ वेळेआधीच संपले.

धान्य बाजारात रांगा

या आठ दिवसांत किराणा, धान्य दुकानेदेखील बंद राहणार असल्याने शनिवार या सुटीच्या दिवशीदेखील लक्ष्मीपुरी धान्य बाजारात तोबा गर्दी होती. गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी, साबुदाणा यासह कडधान्यांच्या खरेदीसाठी धान्य दुकानांबाहेर लांबलचक रांगा लागल्या होत्या. दुकानदारांनी समोर कामगार ठेवून हे साहित्य देण्याची व्यवस्था केली होती. अकरा वाजले तरी या रांगा संपलेल्या नव्हत्या. या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असतो; मात्र शनिवारी अकरा वाजून गेल्यानंतरदेखील काही वेळासाठी सूट देण्यात आली होती.

जागा मिळेल तेथे विक्री

सध्या भाजी मंडईपेक्षा रस्त्यावरचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत आहे. त्यामुळे भाजीवाल्यांपासून ते आंबा विक्रेत्यांपर्यंत सगळेच मुख्य रस्त्यालगत जास्त रहदारी असेल, अशा ठिकाणी जागा मिळेल तिथे बसून आपल्या साहित्यांची विक्री करत होते. लक्ष्मीपुरी मेन रोड, राजारामपुरी, मिरजकर तिकटी, बागल चौक, बिनखांबी गणेश मंदिर, शिंगोशी मार्केट या ठिकाणी भाजी खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ होती.

पेट्रोलसाठी रांगा

पुढील आठ दिवस फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. त्यामुळे शनिवारी अनेकजणांनी गाडीच्या टाक्या पेट्रोल भरून फुल्ल केल्या. पुढच्या काही दिवसात अचानक बाहेर पडावे लागले, तर तजवीज हवी म्हणून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल भरले गेले, त्यामुळे शहरातील सगळ्याच पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या.

दूध, आंबा, चिरमुऱ्याचा स्टॉक

या आठ दिवसांत दुधाचे वितरण नियमित सुरू राहणार असले, तरी नागरिकांनी शनिवारीच दोन दिवस पुरेल इतक्या दुधाचा स्टॉक करून ठेवला आहे. त्यामुळे अनेक दुकानांमधील दूध संपले होते. चिरमुरे, फुटाणे, खारे शेंगदाणे यासह आंब्याचीही खरेदी करण्यात आली. सध्या लॉकडाऊनमुळे आंब्याचे दर कमी झाले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांनांही हापूस, पायरी अशा आंब्यांचा आस्वाद घेता येऊ लागल्याने अगदी दोन डझनाच्या पटीत आंब्याची खरेदी करण्यात आली.

-

फोटो नं १५०५२०२१-कोल-मार्केट०१

ओळ : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होणार असल्याने सकाळी शहरातील ताराबाई रोडवर साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची अशी गर्दी उसळली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--

०२

शहरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेला जणू यात्रेचे स्वरूप आले होते.

---

०३

बिंदू चौक ते लक्ष्मीपुरी मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाले होते.

--

०४

बागल चौक ते शाहूपुरी रस्त्यावरदेखील वाहनांची अशी गर्दी होती.

--

०५

धान्य दुकानांसमोर ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला होता.

--

०६

शहरातील पेट्रोल पंपांवर अशा रांगा लागल्या होत्या.

-

सर्व छाया : आदित्य वेल्हाळ

Web Title: On city streets, on Corona Manguti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.