शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर, धोका मात्र आजही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:59+5:302021-09-16T04:30:59+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून, सध्या शहरात केवळ ४५ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरवासीयांच्या दृष्टीने ही एक ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून, सध्या शहरात केवळ ४५ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरवासीयांच्या दृष्टीने ही एक चांगली बातमी असली तरी, कोरोना संसर्गाचा धोका मात्र आजही कायम आहे. मंगळवारी झालेल्या गौरी-गणपती विसर्जनावेळी अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते, गर्दी टाळण्याचे भान राहिले नाही. त्यामुळे जरी कोरोना संसर्ग कमी होत असला, तरी तो पुन्हा नव्याने सुरूहोणार नाही, यादृष्टीने अधिक जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेची रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर्संमधून केवळ ३६ रुग्ण उपचार घेत आहेत. नऊ रुग्ण गृह अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. बुधवारी नव्याने केवळ १६ रुग्ण आढळून आले. एकेकाळी शहरातील रुग्णालयातून तसेच कोविड सेंटर्समधून रुग्णांवर उपचार करण्यास बेड मिळत नव्हते; पण आता सर्वच रुग्णालये मोकळी पडली आहेत.
एकीकडे रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, नवीन रुग्णांची संख्या घटत असताना, वातावरणातील संसर्गाचा धोका कमी झाला आहे. मात्र दुसरीकडे गणेशोत्सव सुरू झाल्यामुळे शहरात गर्दी वाढत आहे. मास्क लावणे, गर्दी टाळणे या महत्त्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. मंगळवारी घरगुती गौरी गणपती विसर्जन झाले. त्यावेळी या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. म्हणूनच कोरोनाचा धोका संपलेला नाही. यापुढील काळात अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे.