शहर तापले; मार्केट गारठले
By admin | Published: April 17, 2017 12:59 AM2017-04-17T00:59:42+5:302017-04-17T00:59:42+5:30
कोल्हापूर @ ३९ डिग्री : कडक उन्हामुळे नागरिक हैराण
कोल्हापूर : उन्हाचा तडाखा वाढल्याने कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. उष्णतेचा पारा गेल्या आठवड्यापासून ३९ सेल्सिअस अंशांवर पोहोचल्याने असह्य होणाऱ्या उन्हापासून वाचण्यासाठी बहुतांश लोक दुपारचा वेळ घरातच घालवीत आहेत. रविवारी उष्णतेचा पारा ३९ सेल्सिअस अंशांवर पोहोचल्याने दुपारनंतर शहरातील अधिकतर रस्ते हे ओस पडल्याचे, तर बाजारपेठांमध्ये शांतता पसरल्याचे दिसून आले.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच यंदा उन्हाच्या झळा बसू लागल्या. मार्चमध्ये दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे वातावरण होते. एप्रिलच्या सुरुवातीपासून उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कडक ऊन आणि झोंबणाऱ्या झळा त्यांना सहन कराव्या लागत आहेत. अनेकांनी त्यापासून संरक्षणासाठी दुपारी बाहेर न पडता एक ते चार यावेळी घरात थांबण्याचा अथवा ज्यांचे फिरतीचे काम आहे, त्यांनी कार्यालय, बगीचा या ठिकाणी विश्रांती घेण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक, सायबर चौक, आदी परिसरांतील नेहमी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य होत आहेत.
दुपारी बारापर्यंत आणि चारनंतर बाजारपेठेत लोकांची वर्दळ दिसून येत आहे. तापमानाचा पारा ३९ सेल्सिअस अंशांवर पोहोचल्याने रविवारी अनेक रस्ते दुपारच्या वेळी ओस पडले होते. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी या बाजारपेठांमध्ये शांतता होती.
दुपारी शांतता
उन्हाचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. दुपारी एक ते चार या वेळेत ग्राहकांचे प्रमाण अल्प असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी सांगितले. ते म्हणाले, सकाळी दहा ते दुपारी एक आणि दुपारी साडेचार ते रात्री नऊ या वेळेत ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.
तापमान कमीची आशा
गेल्या आठवड्यात कोल्हापुरातील तापमान ३२ ते ३९ सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. हिमालयातून येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलली, तरच तापमान काहीसे कमी होण्याची आशा आहे, असे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सांगितले.