शहर होणार आज ‘शिवमय’
By Admin | Published: February 19, 2016 12:24 AM2016-02-19T00:24:57+5:302016-02-19T00:28:41+5:30
शिवजयंतीची जय्यत तयारी; शिवजन्मकाळ, मिरवणुका, व्याख्यानासह विविध उपक्रम
कोल्हापूर : शिवजन्मकाळ, भव्य मिरवणुका, व्याख्याने, विनामूल्य आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांनी आज, शुक्रवारी शहरात शिवजयंती साजरी होणार आहे. विविध तरुण मंडळे, संस्थांनी शिवजयंतीची जय्यत तयारी केली आहे. त्याला प्रबोधनासह सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात आली आहे. जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवाजी चौक, निवृत्ती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई गुरुवारी करण्यात आली होती.
शहरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे नर्सरी मैदान येथील मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होईल. शिवाजी पेठेतील श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे सकाळी आठ वाजता उभा मारुती चौकात शिवजन्मकाळ सोहळा होणार आहे. त्यानंतर अर्धा शिवाजी पुतळा येथे सकाळी नऊ वाजता शिवज्योतीचे स्वागत होणार आहे. दुपारी चार वाजता ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने उभा मारुती चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे सायंकाळी साडेपाच वाजता हुतात्मा पार्क येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. आनंदी महिला जागृती संस्थेतर्फे आर. के. नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.
छत्रपती शाहूराजे फौंडेशनतर्फे मिरजकर तिकटी येथे दहा वाजता जिलेबी वाटप केले जाणार आहे. कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे शिवजयंती साजरी होणार आहे. दरम्यान, शहरातील विविध परिसरात गुरुवारी तरुण, लहान मुले जयंतीच्या तयारीत गुंतली होती. सायंकाळनंतर शिवज्योत आणण्यासाठी विविध मंडळांचे कार्यकर्ते पन्हाळ्याला रवाना झाले. काहीजण मंडप सजावट, मिरवणुकीची तयारी करत होते. (प्रतिनिधी)
असे होणार उपक्रम, कार्यक्रम
कलानिधी गडाची सफाई : कागल येथील वनमित्र संस्था दोनशे स्वयंसेवकांच्या माध्यमातून चंदगड येथील कलानिधी गडाची साफसफाई गुरुवारी सुरू केली आहे. आज, शुक्रवारी ही मोहीम सुरू राहणार आहे.
शेकापतर्फे व्याख्यान : ‘शेकापक्षाच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता
प्रा. डॉ. संदीप कीर्दत यांचे व्याख्यान होणार आहे.
ढोल-ताशा वादन : शनिवार पेठेतील शाहू गर्जना ढोल-ताशा पथकाचे सकाळी साडेनऊ वाजता नर्सरी मैदान येथे सादरीकरण
शिवकल्याण कन्या निधीचे वितरण : शिवराष्ट्र संस्था व रोटरी क्लब आॅफ कोल्हापूरतर्फे माजलगाव (बीड) मधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींसाठी २२ फेब्रुवारीला एकूण दोन लाख रुपयांच्या शिवकल्याण कन्या निधीचे वितरण होणार आहे.